Maharashtra Weather Update : राज्यासह देशभरात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) महत्त्वाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारनंतर पावसाळी ढगांची निर्मिती होत असल्याने थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.(Maharashtra Weather Update)
संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर थंडीचा जोर कमी झाला. (Maharashtra Weather Update)
उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा मोठा अलर्ट देण्यात आला असला तरी त्या अपेक्षित प्रमाणात महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी राज्यातील तापमानात सतत चढ-उतार होत आहेत.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात थंडी कायम राहणार असली तरी सध्याच्या परिस्थितीत किमान तापमानात वाढ दिसून येत आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता असून तोपर्यंत ढगाळ हवामानाचा प्रभाव कायम राहील.
आजही राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम
मागील २४ तासांत धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि जळगावमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत या परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
कोकणात दमट हवामान, मराठवाड्यात ढगाळ वातावरण
कोकण किनारपट्टीसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दमट हवामान वाढण्याची शक्यता असून पहाटेचा गारठा वगळता थंडीचा प्रभाव कमी जाणवेल.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिणेकडील बदलत्या हवामान प्रणालींचा राज्यावर संमिश्र परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
परभणीत अवकाळी पावसाची हजेरी
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात रात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. हिवाळ्यात पावसाचा अनुभव घेत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशपातळीवर हवामानाची स्थिती
हवामान विभागानुसार, १६ ते १९ जानेवारीदरम्यान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
१८ आणि १९ जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांमध्येही पावसाचा अंदाज आहे.
दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, कराईकल, माहे तसेच आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या देशात पूर्वोत्तर मान्सूनला पूरक परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील हवामान सध्या अस्थिर असून कधी गारठा, कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस असा अनुभव नागरिक घेत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Summary : Maharashtra weather update: Expect changing conditions. Stay informed about potential rainfall and temperature fluctuations across the state. Prepare accordingly for varied weather patterns. Be alert for official advisories.
Web Summary : महाराष्ट्र मौसम अपडेट: बदलते मौसम की उम्मीद। राज्य भर में संभावित वर्षा और तापमान में उतार-चढ़ाव के बारे में जानकारी रखें। विविध मौसम के लिए तैयार रहें। आधिकारिक सलाहों के लिए सतर्क रहें।