Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता असून ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)
मात्र, विदर्भात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरलेला असतानाच, विदर्भातील काही भागांमध्ये मात्र, हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यातील इतर भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून, आकाश ढगाळ राहणार आहे. पुढील तीन-चार दिवस विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
कोकण आणि मुंबई विभागात पावसाची विश्रांती
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाची तीव्रता आता कमी झाली आहे. आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सौम्य पावसाचा अंदाज
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहील आणि हलक्या सरींची शक्यता आहे. घाटमाथ्यांवर मात्र हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाने घेतली माघार
छत्रपती संभाजीनगरसह बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्याच सरी पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, तुरळक सरी
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहील आणि तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही.
विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर जाणवणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
दुसरीकडे, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी असून उष्णता आणि दमटपणा जाणवतोय.
शेतकऱ्यांना सल्ला
* विदर्भातील शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
* मशागतीची कामे हवामान लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने करावीत.
* ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका असल्यामुळे पीक संरक्षणाची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.