Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. फेब्रुवारी अखेरीस उष्णतेचा प्रभाव झपाट्याने वाढत असून काही भागांत अवकाळी पावसाचं सावटही निर्माण झालं आहे. (Maharashtra Weather Update)
एका बाजूला मुंबईत तापमान चाळीशीच्या दिशेनं सरकत आहे, तर दुसरीकडे मराठवाडा-विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ ते ७२ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.(Maharashtra Weather Update)
मुंबईत तप्तपर्वाची चाहूल
मुंबईचा कमाल पारा ३६.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यातच अशी उष्णता जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास तापमान ३४ ते ३५ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे उकाडा अधिक जाणवेल. विशेषतः सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हाचा दाह असह्य होण्याची शक्यता वर्तविली आहे. मंगळवारनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट
भारतीय हवामान विभागने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
देशभरात हवामानातील बदल
देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या स्वरूपाचं हवामान पाहायला मिळत आहे. पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या पर्वतीय भागांत पावसाचा अंदाज आहे.
२२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान तेलंगणा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
दक्षिणेत केरळ आणि तामिळनाडूमध्येही पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत आहे.
तापमानाचा विभागनिहाय अंदाज
कोकण: कमाल तापमान ३४ ते ३६°C, किमान २२ ते २४°C
पश्चिम महाराष्ट्र: कमाल ३६ ते ३८°C, किमान १८ ते २०°C
मराठवाडा-विदर्भ: कमाल ३७ ते ३९°C पर्यंत वाढण्याची शक्यता
कोकण किनारपट्टी भागात दमट उकाडा, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडी व तीव्र उष्णता जाणवणार आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
* दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा
* पुरेसे पाणी प्या आणि डोक्यावर संरक्षण ठेवा
* शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी
* विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत उभे राहू नये
अवकाळी पावसामुळे मिळालेला तात्पुरता दिलासा संपला असून राज्यात पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
पुढील ७२ तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* दुपारच्या तीव्र उन्हात पिकांना पाणी देणं टाळा; सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सिंचन करा.
* ठिबक/फवारणी पद्धतीचा वापर करून पाण्याची बचत करा.
* भाजीपाला व फळबागांमध्ये मल्चिंग (आच्छादन) केल्यास जमिनीतील ओल टिकून राहते.
* नव्याने लावलेल्या रोपांना सावली जाळीचा (Shade Net) वापर करावा.
Web Summary : Maharashtra's weather shifts drastically. Heatwave grips Mumbai, while Marathwada and Vidarbha brace for thunderstorms. Farmers advised to protect crops amid fluctuating conditions. Temperatures vary across regions, with heat warnings issued.
Web Summary : महाराष्ट्र के मौसम में भारी बदलाव। मुंबई में हीटवेव, मराठवाड़ा और विदर्भ में गरज के साथ बारिश की चेतावनी। किसानों को बदलते मौसम में फसल बचाने की सलाह। तापमान में बदलाव, गर्मी की चेतावनी जारी।