Maharashtra Weather Update : कोरडी हवा आणि उत्तरेकडून वाहत येणाऱ्या तीव्र शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारठा कायम असून, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)
विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईपर्यंत या थंडीच्या लाटेचा प्रभाव पोहोचला आहे. पहाटेच्या वेळी समोरचं स्पष्ट दिसणार नाही इतकं दाट धुकं पडत असून, यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
गेल्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमानात थोडा चढ-उतार दिसून आला असला, तरी पुढील २४ तास शहरातील हवामान तुलनेनं स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, राज्याच्या इतर भागांमध्ये गारठा कायम राहणार असून, नागरिकांनी थंडीपासून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक
मागील २४ तासांत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, परभणी परिसरात थंडीच्या लाटेसदृश परिस्थिती अनुभवायला मिळाली. तापमानात काहीशी वाढ नोंदवली गेली असली तरी गारठा काही लवकर कमी होणार नाही, असे संकेत आहेत. परिणामी पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांतही थंडीची तीव्रता जाणवणार आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ९ ते १२ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री प्रचंड गारवा, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अशी दुहेरी स्थिती जाणवणार आहे.
धुक्याचा फटका; दृश्यमानता कमी
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून सूर्य डोक्यावर येईपर्यंत दाट धुकं पडत आहे. यामुळे रस्ते, महामार्ग आणि ग्रामीण भागांमध्ये दृश्यमानता कमी होत असून, वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सुट्ट्यांचा कालावधी आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक राज्यातील गिरीस्थानं आणि पर्यटनस्थळांकडे वळताना दिसत आहेत.
पुढील ४८ तासांचा अंदाज
पुढील ४८ तासांत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि आसपासच्या भागांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडं राहील, मात्र दिवसा उन्हाचा चटका जाणवेल. रात्री आणि पहाटे गारठा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
देशभरातही थंडीची लाट कायम
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात थंडीचा कडाका कमी-जास्त राहील, मात्र उत्तर भारतात परिस्थिती अधिक गारठवणारीच राहील, असा इशारा दिला आहे.
हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील बहुतांश भाग आणि ईशान्य भारतासाठी दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमालयीन भागात बर्फवृष्टी
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे तापमानात लक्षणीय घट होत असून, काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या तीव्र थंडीमुळे (चिल्लई कलां) गारठा अधिक वाढला आहे. हिमालयावरून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे.
हिमाचल प्रदेशातील रेकाँगपिओ येथे वाऱ्यांचा वेग ताशी ३७ किमी इतका नोंदवण्यात आला आहे. लाहौल खोऱ्यातील ताबो, कुकुमसेरी, किलाँग येथे तापमान शून्याखाली घसरले आहे.
सध्या जोरदार बर्फवृष्टीचा इशारा नसला, तरी काश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू असून येत्या काळात बर्फाचं क्षेत्र अधिक विस्तारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या पार्श्वभूमीवर हिमालयीन भागात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पुढील नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* थंडीमुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळबागांवर दव व गारठ्याचा परिणाम होऊ शकतो. पहाटे दव सुकल्यानंतरच आंतरमशागत व फवारणी करावी.
* लहान रोपांवर गवत, पेंढा, प्लास्टिक मल्च किंवा शेडनेट वापरून आच्छादन केल्यास थंडीपासून संरक्षण मिळेल अशी व्यवस्था करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra is experiencing changing weather patterns. Stay updated with the latest forecast for temperature fluctuations and potential rainfall across the state. Prepare for varied conditions.
Web Summary : महाराष्ट्र में मौसम बदल रहा है। राज्य में तापमान में उतार-चढ़ाव और संभावित वर्षा के लिए नवीनतम पूर्वानुमान से अपडेट रहें। विविध स्थितियों के लिए तैयार रहें।