Maharashtra Rain Alert : सध्या राज्यात अवकाळीचे वातावरण (Unseasonal Rain) झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अरबी समुद्रात दिड किमी. उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल (Climate Change) समजावा, अशी माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
अवकाळीचे वातावरण :
महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव बीड नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती अशा २६ जिल्ह्यात उद्या शनिवार दि. ३ ते १० मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ ठिकाणी एखाद्या- दुसऱ्या दिवशी वीजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून, झालाच तर अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष असे घाबरून जाऊ नये. केवळ सावधानता बाळगावी. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील वरिल ७ जिल्ह्यात विशेष जाणवू शकतो, व एखाद्या दुसऱ्या दिवशी किरकोळ गारपीटीचीही शक्यता नाकारता येत नाही, असे वाटते.
येत्या आठवड्यातील तापमान :
सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान ३८ डिग्री तर काहीं ठिकाणी विशेषतः छ.सं.नगर, धाराशिव ह्या जिल्ह्यात ४० डिग्रीच्या दरम्यान जाणवते. सदरचे तापमान जळगाव, जेऊर सोलापूर अकोला अमरावती वर्धा ब्रम्हपुरी वगळता जवळपास सरासरी इतकेच जाणवत असुन उद्या पासूनच्या आठवड्यात महाराष्ट्रात हे तापमान अजुन एखाद्या दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे. उन्हाची ताप त्यामुळे अधिक सुसह्य जाणवेल, असे वाटते.
उष्णतेची लाट वा रात्रीचा उकाडा- सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.