नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ७२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत ८३८.९ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान क्षमता ९३३.८ मिमी इतकी असते.
जायकवाडीकडे ७७ टीएमसी पाणी...
नाशिक जिल्ह्यातील धरणातून झालेल्या विसर्गामुळे सप्टेंबर अखेर जायकवाडी धरणात तब्बल ७७ टीएमसी पाणी जमा झाले आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीकडे ८ लाख ९९ हजार ६८१ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग होऊन एकूण ७७ हजार ७६० दलघफू पाणी रवाना झाले आहे.
महिनानिहाय पाऊस :
जून : सरासरी १७४ मिमी अपेक्षित असताना २२३ मिमी पाऊस झाला.
जुलै : ३०८ मिमी सरासरी असताना केवळ १९८ मिमी पावसाची नोंद झाली.
ऑगस्ट : सरासरी १९८ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२० मिमी पाऊस झाला.
सप्टेंबर : १५३ मिमी सरासरी असताना १३९.८ मिमी पाऊस झाला.
धरणांची स्थिती
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी, केळझर आणि माणिकपुंज अशी ११ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट संपुष्टात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १५ धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा शंभर टक्केपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे.