जळगाव : खान्देशात सर्वत्र वैशाख वणव्याचा प्रकोप बघायला मिळत आहे. मंगळवारी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांचे तापमान ४५ अंशाच्या वर पोहचले होते; त्यात भुसावळ शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४५.८ अंश तापमान नोंदवले गेले, त्याखालोखाल जळगावात ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
धुळे जिल्ह्यात मंगळवारी दुसऱ्यांदा ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. याआधी २७ एप्रिल रोजी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. नंदुरबारात सोमवारी ४४ अंशावर असलेला पारा मंगळवारी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी उन्हापासून संरक्षणासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव, भुसावळात हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद
जळगावकर २०१७ नंतरचा सर्वात भीषण उन्हाळा अनुभवत आहेत. १२ मे रोजी जळगाव शहराचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भुसावळात तर ४५.८ अंश तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. ममुराबाद वेधशाळेनुसार, यंदाच्या हंगामातील हा उच्चांक असून, आगामी आठवडाभर जळगावकरांना उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
हवामान विभागाने उष्णतेची तीव्रता पाहता जिल्ह्यात १४ मेपर्यंत 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. २०१७ नंतर केवळ २०२४ आणि आता २०२६ मध्येच तापमानाचा पारा ४५.५ अंशांपर्यंत पोहचला आहे. हवामान अंदाजानुसार, २० मेनंतरच अवकाळी पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारला पात्र शेतकऱ्यांची माहिती सादर, आता मेअखेर कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता?
