महान (जि. अकोला) : काटेपूर्णा धरण पाणलोट क्षेत्रात २५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता काटेपूर्णा धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी ६० सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले. (Katepurna Dam Water Release)
या दरवाजांतून सुमारे १०२.३३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. (Katepurna Dam Water Release)
सहा दिवसांपूर्वीच गेट उघडण्यात आले होते; आता पुन्हा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Katepurna Dam Water Release)
जलसाठा जवळपास शंभर टक्के
विसर्ग सुरू करताना धरणात तब्बल ९९.६५ टक्के जलसाठा होता. पाणलोट क्षेत्रातून येणारा वाढता पाण्याचा ओघ तसेच येवा व काटा कोंडाहा नदीचा प्रवाह लक्षात घेऊन विसर्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने इशारा देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विसर्ग सुरू असताना नदीपात्रात प्रवेश करणे किंवा नदी पार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याआधीही झाला होता विसर्ग
यापूर्वी २० सप्टेंबर रोजी काटेपूर्णा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर केवळ सहा दिवसांनी पुन्हा वाढत्या जलसाठ्यामुळे २६ सप्टेंबर रोजी गेट उघडण्यात आले.
अधिकाऱ्यांची सतत देखरेख
धरणातील वाढत्या पाण्याच्या स्थितीवर कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे व कर्तव्यदक्ष कर्मचारी मनोज पाठक सातत्याने लक्ष ठेवत आहेत. पाण्याचा विसर्ग नियोजनबद्ध व सुरळीतपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.