Isapur Dam : यंदा अतिवृष्टीमुळे इसापूर धरण १०० टक्के भरले असले, तरी रब्बी हंगामासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी पाणीपाळी अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. (Isapur Dam)
नोव्हेंबर महिना संपत आला तरी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे कोणतेही स्पष्ट नियोजन जाहीर केलेले नसल्याने हजारो हेक्टर जमीन पडीक राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरिपानंतर आता रब्बी हंगामही अडचणीत येऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.(Isapur Dam)
धरण भरले पण योजना रिकाम्या!
इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा मोठा भूभाग येतो. धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही पाणीपाळी उशिरा होत असल्याने पाण्यावर अवलंबून असलेली शेती संकटात सापडली आहे.
दरवर्षी रब्बीसाठी ऑक्टोबरमध्ये पाणीपाळी सोडण्याचे नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरीसही नियोजनच नाही.
धरण भरलेय… मग आमच्या शेतात पाणी का येत नाही? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
१६ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात
तालुक्यातील तीन प्रमुख शाखांमधून मिळून एकूण १६ हजार हेक्टर क्षेत्र इसापूर सिंचनावर अवलंबून आहे:
शाखा १४ : २१ किमी वितरिका—१४ गावं—६,००० हेक्टर क्षेत्र
शाखा १५ : ११ किमी—६ गावं—२,८०० हेक्टर क्षेत्र
शाखा १६ : २२ किमी—२१ गावं—६,४०० हेक्टर क्षेत्र
या सर्व भागांत रब्बीसाठी लागणारे पाणी न मिळाल्यास गहू, ज्वारी, हरभरा, उस व केळी या सर्व पिकांना मोठा फटका बसणार आहे.
कालव्यांची दुरवस्था
पाण्याची विलंबित पाळी यामागे आणखी एक गंभीर समस्या म्हणजे कालव्यांची दयनीय अवस्था.
अनेक कालवे गाळ, माती आणि झुडुपांनी भरलेले
अनेक ठिकाणी बांधकाम उखळलेले
झाडांनी वेढलेले कालवे पूर्णपणे अडथळीत
पाण्याची वाहतूक क्षमता अर्ध्यापेक्षा कमी
कालवे साफ नसतील तर पाणी सोडलं तरी शेतात पोचणार कसं? असा सवाल शेतकरी विचारतात.
पिकांना फटका बसतोय
उशिरा पाणी सोडल्याने दरवर्षी पिकांना फटका बसतोय. उत्पादन घटतंय आणि खर्च वाढतोय. नियोजनच नसल्याने आमची शेती डबघाईला आली आहे. - राजेश टेकाळे, शेतकरी
केळी, ऊस, रब्बी पिकांना धोका
इसापूर धरणावर हजारो शेतकरी अवलंबून आहेत.
अलीकडेच मोठ्या प्रमाणात केळी व ऊस लागवड
रब्बी पिके गहू, ज्वारी, हरभरा सर्व पिकांची पाण्यावर पूर्ण अवलंबित्व
पाणी उशिरा आल्यास शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे नियोजन कोलमडून पडणार आहे.
मग निर्णय कोण अडवतो?
इसापूर १०० टक्के भरले असतानाही पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संताप आहे.
शेतकऱ्यांची मागणी
आमचं नुकसान भरून काढणार कोण?
पाटबंधारे विभागाची गाढ झोप कधी मोडणार?
कालव्यांची तात्काळ साफसफाई
उखडलेल्या बांधकामांची दुरुस्ती
रब्बी हंगामासाठी त्वरित पाणीपाळी सुरू करावी
पाणी नियोजनातील त्रुटींसाठी जबाबदारांवर कारवाई
