Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरले असले तरी पाण्याचे नियोजन न झाल्याने गेली अनेक दिवस शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. (Isapur Dam)
मात्र, पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती व स्वच्छता अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 'पाणी वेळेवर येईल का? आणि कालवा फुटणार नाही ना?' असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.(Isapur Dam)
हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांतील हजारो हेक्टर जमीन सिंचनाअभावी पडीक राहण्याची वेळ येत होती. पाणीपाळी लांबणीवर गेल्याने रब्बी हंगाम हातातून जाईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत होते. (Isapur Dam)
लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अखेर पाटबंधारे विभाग हालचालीस आला आणि पाणीपाळीचे नियोजन जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Isapur Dam)
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी पाणीपाळीचे अधिकृत वेळापत्रक
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा व उजवा कालवा तसेच वितरण व्यवस्थेद्वारे रब्बी हंगामासाठी पाणीपुरवठा पुढीलप्रमाणे होणार आहे. कार्यकारी अभियंता अभय जगताप (उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक 1, नांदेड) यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
पहिली पाणीपाळी : १५ डिसेंबर २०२५
दुसरी पाणीपाळी : ८ जानेवारी २०२६
तिसरी पाणीपाळी : ५ फेब्रुवारी २०२६
या नियोजनामुळे रब्बी हंगामातील गहू, चना, ज्वारी, भाजीपाला, हिरवळीची पिके आणि फळबागांना अपेक्षित पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कालवा स्वच्छतेला मुहूर्त केंव्हा?
पाणी सोडण्याच्या तारखा निश्चित झाल्या असल्या तरी कालव्यांची विद्यमान स्थिती अत्यंत दयनीय आहे.
अनेक ठिकाणी कालव्यांमध्ये गाळ साचला आहे
गवत, काटेरी झाडे आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत
काही ठिकाणी कालव्यांच्या भिंतींना तडे गेले असल्याचेही शेतकरी सांगतात
रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता अत्यावश्यक आहे. पण अद्याप या कामांना सुरुवात झाल्याचे कोणतेही चित्र दिसत नाही. त्यामुळे, “पाणी येणार पण कालवा तयार नाही… मग शेतात पाणी पोहचणार तरी कधी?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
कालवे फुटण्याचा गंभीर धोका
जर कालवा स्वच्छ नसेल तर पाणी सोडताना मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
गाळ व कचरा अडकल्याने पाणी एकाच ठिकाणी अडून राहते
पाण्याचा दाब वाढल्यास कालवा फुगणे किंवा फुटणे सहज शक्य
त्यामुळे खालच्या भागातील शेतजमिनी, पिके आणि गावांना धोका
याच कारणामुळे प्रत्येक वर्षी कालवा दुरुस्तीचे काम वेळेवर करण्याची मागणी होत असते.
पाणीपाळी तर जाहीर केली, आता कामाला लागा!
पाणीपाळी जाहीर होणे चांगले, पण कालवा स्वच्छतेचा कार्यक्रम नक्की केव्हा? पाणी सोडण्याआधी दुरुस्ती पूर्ण न झाल्यास त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून ग्रामीण पातळीवर बैठका व प्रत्यक्ष तपासणी करावी.
इसापूरचे पाणी नियोजन शेतकऱ्यांसाठी आशादायी असले तरी प्रत्यक्षात पाणी शेतात पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा
कालवा स्वच्छता आणि दुरुस्ती अजूनही प्रलंबित आहे.
जोपर्यंत ही कामे वेगाने सुरू होत नाहीत, तोपर्यंत पाणीपाळीचे वेळापत्रक जाहीर होऊनही शेतकऱ्यांच्या चिंता कायमच राहणार आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरलं; पाणीपाळीचे नियोजन कोलमडलं वाचा सविस्तर
