नाशिक : गिरणा धरणाच्या ५६ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच सर्वच्या सर्व १४ दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी हे सर्व दरवाजे उघडले गेले आहेत.
आतापर्यंत गिरणा धरण १५ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र पहिल्यांदाच सर्व दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गिरणा धरणाची पाणी विसर्ग क्षमता २ लाख ९५ हजार क्यूसेक आहे.
१९६९ साली पहाटेच गिरणा धरणातून २ लाख २५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र तेव्हा सर्व म्हणजे १४ दरवाजे उघडले गेले नव्हते.
१५ सप्टेंबर २०२५ पासून धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो सुरू आहे. २८ तारखेला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू झाल्याने दुपारी दीड वाजता १ ते १४ क्रमांकाचे दरवाजे उघडले गेले. १ ते ६ क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी १२० सेंमी तर ७ ते १४ क्रमांकाचे दरवाजे ३० सेंमी उघडले गेले. यामुळे ३९ हजार ६१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.