Gangapur Dam : गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा स्थिर असल्याचे चित्र आहे. आजमितीस म्हणजेच ०४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील धरणात ९९.३३ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण २६ प्रकल्पांपैकी जवळपास १५ धरणे शंभर टक्के भरले असून यामध्ये गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, वाकी, भाम, हरणबारी, नागासाक्या, गिरणा, माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे.
तर गंगापूर धरण ९८.८५ टक्के, कश्यपी धरण ९८.३३ टक्के, पालखेड धरण ९४ टक्के, पुणे गाव धरण ९९ टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधारा ८१.७१ टक्के, भोजापुर धरण ९९ टक्के, चणकापूर धरण ९९ टक्के, केळझर धरण ९८ टक्के आणि पुनद धरण ९९ टक्के इतके भरले आहे.
यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे यंदा पाण्याची चिंता बऱ्यापैकी मिटल्याचे दिसून येत आहे. शिवाय गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मोठा विसर्ग जायकवाडीकडे करण्यात आला. त्यामुळे जायकवाडी धरणही चांगले भरले आहे. या धरणातून देखील पुढे गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे.