नाशिक : गेल्या चार दिवसांपासून शहर, जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. गुरुवारी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. बुधवारी त्र्यंबकमध्ये पडलेल्या पावसामुळे गंगापूर धरण (Gangapur Dam) क्षेत्रात आवक वाढली. त्यामुळे पुन्हा गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला.
त्र्यंबकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढत आहे. सध्या गंगापूर धरणात ९८.५६ टक्के पाणीसाठा असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी गंगापूर धरणातून २७६ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो ८६० ने वाढवून ११३६ क्यूसेक करण्यात आला आहे.
गेल्यावर्षीपेक्षा सुधारणा२०२४ मध्ये साठा २० टक्के होता, तर २०२५ मध्ये तो ९९ टक्के झाला आहे. एकूण साठा जवळपास ७ हजार द.ल.घ.फु.ने जास्त झाला असून, विशेष म्हणजे गेल्यावर्षी सप्टेंबरच्या मध्यातही धरणांमधील पाणीसाठा २० टक्के इतकाच होता, यंदा धरणे ९९ टक्केच्या आसपास पोहोचली आहेत.
मालेगाव, त्र्यंबकमध्ये सरासरी पाऊस...मालेगाव (१२४ टक्के) व त्र्यंबकेश्वर (१०४ टक्के) या तालुक्यांत पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. नाशिक शहर परिसरात ९२ टक्के पाऊस नोंदला गेला असून, पिकांना पुरेसा ओलावा मिळाला आहे. पिंपळगाव, सिन्नर, पेटा या भागातही पावसाचे प्रमाण साधारण सरासरीच्या आसपास आहे. इगतपुरी तालुक्यातील स्थिती गंभीर असून, येथे केवळ ५९ टक्के पाऊस झाला आहे. डोंगराळ भागातील सुरगाणा ६४ टक्के व कळवण ६७ टक्के या तालुक्यांतही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वातावरणाची जलधारण करण्याची वाढलेली क्षमता, थंडावा लागताच होणारी ढगफुटी आणि धरणातील पाण्याचे कोलमडलेले व्यवस्थापन सातत्याने देशभरात दिसून येते आहे. जलव्यवस्थापन व एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे ठरेल. चीनमध्ये वाढलेले तापमान शेजारील देशांमधील वातावरण बदलण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसते आहे.- किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक