Dam Water Level Decreasing : गतवर्षी पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प १०० टक्के भरले होते. मात्र रब्बी हंगामात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा आणि वाढत्या उन्हामुळे या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात ३९ टक्क्यांची घट झाली आहे.(Dam Water Level Decreasing)
सध्या जिल्ह्यातील एकूण ६७ प्रकल्पांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती लघू पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.(Dam Water Level Decreasing)
विभागाच्या अंदाजानुसार, उपलब्ध साठा मे-जूनपर्यंत पुरेल, त्यामुळे तातडीची पाणीटंचाई भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(Dam Water Level Decreasing)
पावसाळ्यात ओव्हरफ्लो, आता उन्हाचा तडाखा
गतवर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने नदी-नाले खळखळून वाहिले. अनेक तलाव आणि प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. परिणामी शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले.
रब्बी हंगामात गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे प्रकल्पांतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.
७ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१.५७% साठा
जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ७१.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
गल्हाटी धरण – ७८.२८%
कल्याण गिरजा प्रकल्प – ७७.९७%
कल्याण मध्यम प्रकल्प – ८४.५३%
अपर दुधना प्रकल्प – ७५.४२%
जुई प्रकल्प – ५२.२४%
धामना प्रकल्प – ६२.६९%
जिवरेखा मध्यम प्रकल्प – ४०.२६%
यामध्ये गल्हाटी धरणात सर्वाधिक ७८% पेक्षा अधिक साठा, तर जिवरेखा प्रकल्पात सर्वात कमी ४०% साठा असल्याचे दिसून येते.
६० लघू प्रकल्पांत ५४.८४% पाणी
जिल्ह्यातील ६० लघू प्रकल्पांमध्ये सध्या ५४.८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूणच ६७ मध्यम व लघू प्रकल्पांचा विचार करता साठ्यात ३९ टक्के घट झाली असली, तरी उपलब्ध पाणी आगामी दोन ते तीन महिन्यांसाठी पुरेसे ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी दिलासा, तरीही सावधगिरी आवश्यक
सध्या पाण्याची तीव्र टंचाई भासणार नसली तरी उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने वापर, ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब आणि जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जालना जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा समाधानकारक असला, तरी ३९ टक्के घट ही चिंताजनक बाब आहे.
आगामी पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजनबद्ध वापर आणि प्रशासनाचे काटेकोर व्यवस्थापन आवश्यक ठरणार आहे.
अधिक वाचा : Yeldari Dam Water Release : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; येलदरी धरणातून उन्हाळ्यासाठी पाणी सुरू
