Maharashtra Thandi : सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असुन कडाक्याची थंडी मात्र केवळ आजच जाणवू शकते.
उद्या व परवा गुरुवार-शुक्रवारी (२०-२१ नोव्हेंबर ला) पहाटे ५ च्या किमान तापमानात वाढ होवून थंडी काहीशी कमी होईल. शनिवार ते शनिवार दि. २२ ते २९ नोव्हेंबर च्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते.
खालील ठिकाणी व लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट- ठिकाण, किमान तापमान (सरासरीच्या खाली).
जळगांव ८.१(-६.७), जेऊर ७(-७.५), अहिल्यानगर- ८.५ (-५.२), नाशिक- ९.७ (-४.९), मालेगाव ९.४ (-५.७), पुणे ९.५(-५.५), तसेच डहाणू १५.८(-५.९), मुंबई सांताक्रूझ १६.२(-५), सातारा ११(-५.१), छ.सं.नगर १०.५(-४.९), नांदेड १०.२(-६), परभणी ११.२(-५.४), अमरावती ११.५(-५.२), यवतमाळ १०.४(-६.६), गोंदिया १०.४(-५.४), वाशिम १०.६(-४.६).
आठवडभर कशामुळे एकाकी थंडी गायब होणार?
शनिवार दि. २२ नोव्हेंबर ला बं. उप सागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होवून सोमवार दि. २४ नोव्हेंबरला त्याचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता असुन ते तीव्र कमी दाब क्षेत्र आंध्र प्रदेश, ओरिसा कि.पट्टी मार्गे पं. बंगालकडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते.
त्याच्या परिणामातून उत्तर व ईशान्य दिशेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव होवून महाराष्ट्रात थंडी गायब होण्याची शक्यता जाणवते. तसेच चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे काय? नाही.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता जाणवते काय?
रविवार व सोमवार दि. २३ व २४ नोव्हेंबर अश्या २ दिवशी, पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग अश्या ६ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून झालाच तर अगदीच किरकोळ अश्या एक ते दिड सेमी, (१० ते १० मिमी.) इतक्या पावसाची शक्यता जाणवते. महाराष्ट्रातील उर्वरित ३० जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता जाणवत नाही.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.
