Climate Change : महाराष्ट्रात आणि देशभरात सरासरी इतके पर्जन्यमान होत असलं तरी पावसाचे दिवस मात्र घटत चालले आहेत. एकाच दिवशी मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अनेक दिवसांची खंड पडणारी परिस्थिती सध्या सामान्य झाली आहे. (Climate Change)
यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडते, पूरस्थिती निर्माण होते आणि हवामानावरील अवलंबित्व असणाऱ्या अनेक क्षेत्रांवर परिणाम होतो. हवामान तज्ज्ञ सुनील कांबळे यांच्या मते, ही स्थिती केवळ नैसर्गिक चक्र नव्हे, तर जागतिक तापमानवाढीमुळे पावसाच्या वेळापत्रकात होणाऱ्या मोठ्या बदलांचे परिणाम आहेत. अचूक हवामान अंदाज आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हाच या बदलांना सामोरे जाण्याचा एकमेव पर्याय आहे. (Climate Change)
महाराष्ट्रात आणि देशभरात सरासरी इतके पर्जन्यमान होते, पण पावसाचे दिवस मात्र कमी झाले आहेत. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आणि त्यानंतर अनेक दिवस खंड पडतो. अशा प्रकारच्या अनियमित पावसाचे थेट परिणाम शेतीवर, पूरस्थितीवर आणि संपूर्ण जीवनशैलीवर दिसून येत आहे.
हा बदल केवळ निसर्गाचाच नव्हे, तर जागतिक तापमानवाढीचा परिणामही हवामानाच्या वेळापत्रकावर होत आहे, असे मत प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे माजी केंद्रप्रमुख सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियात 'उष्णतेच्या लाटा, हवामान विभागाची कार्यपद्धती, वातावरण बदलाचा परिणाम आणि हवामान संज्ञा' या विषयावर आयोजित संवादात ते बोलत होते. 'आम्ही पर्यावरणप्रेमी' या संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी माजी केंद्रप्रमुख सुनील कांबळे यांचे स्वागत केले. 'आम्ही पर्यावरणप्रेमी'चे रुपेश कलंत्री यांनी प्रास्ताविक केले आणि सुहास जोशी यांनी आभार मानले.
हवामान नोंदणीचं आधुनिक तंत्रज्ञान
* कांबळे यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे हवामान मापनाची प्रक्रिया उलगडली.
* त्यांनी सांगितले की, ३ ते ४ महिने किंवा अगदी ३ ते ४ तासांपर्यंतचं हवामान अचूकरीत्या मोजण्याची क्षमता सध्याच्या तंत्रज्ञानात आहे.
* जवळपास १०० हवामान केंद्रे, ४० डॉप्लर रडार, सर्फेस स्टेशन, रेन गेज, आणि बोईज यंत्रणा देशभर कार्यरत आहेत.
* यामुळे शेती, विमानसेवा, सागरी वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्राला हवामान अंदाजाचा मोठा लाभ होतो.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अॅप्स
कांबळे यांनी शेतकऱ्यांसाठी माहिती देताना सांगितले की, हवामानाचा सल्ला घेण्यासाठी आता अनेक ॲप्स उपलब्ध आहेत त्याव्दारे आपण पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळते.
* 'मेघदूत' अॅप : शेतीसाठी हवामान सल्ला
*'दामिनी' अॅप : विजांच्या हालचालींची माहिती
*'मोसम' अॅप : देशाच्या हवामानाचा संपूर्ण आढावा
या अॅप्सचा वापर करून शेतकरी हवामानाशी संबंधित निर्णय अधिक अचूक घेऊ शकतात.
पावसाच्या वेळापत्रकात झाला बदल
* जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ८०% मोसमी पाऊस पडतो.
* उर्वरित २०% पाऊस हा त्या आधी किंवा नंतर होतो.
* आता नोव्हेंबरमध्येही पावसाच्या घटना दिसून येतात, विशेषतः बंगालच्या उपसागरातील बदलामुळे हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत.
संकेतस्थळावर पाच दिवसांची माहिती
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) संकेतस्थळावर, पुढील ५ दिवसांच्या हवामानाची माहिती उपलब्ध असते. ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देऊन संकटाची सूचना दिली जाते. त्यावरून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळते.