lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > कुठे फुलोऱ्यात, कुठे काढणीला, तळपत्या उन्हात पिकांची अवस्था कशी बदलत जाते?  

कुठे फुलोऱ्यात, कुठे काढणीला, तळपत्या उन्हात पिकांची अवस्था कशी बदलत जाते?  

Latest News Climate Change effect of temperature rise on rabi crops? | कुठे फुलोऱ्यात, कुठे काढणीला, तळपत्या उन्हात पिकांची अवस्था कशी बदलत जाते?  

कुठे फुलोऱ्यात, कुठे काढणीला, तळपत्या उन्हात पिकांची अवस्था कशी बदलत जाते?  

हवामान बदलानुसार प्रत्येक वर्षातील रब्बी हंगामाच्या कालावधीचे दोलनही मागे-पुढे हेलकावते.

हवामान बदलानुसार प्रत्येक वर्षातील रब्बी हंगामाच्या कालावधीचे दोलनही मागे-पुढे हेलकावते.

शेअर :

Join us
Join usNext

साधारण १०० ते १२० दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणारी रब्बी पिके ही ऑक्टोबर ते मार्च दरम्यानच्या पाच महिन्यात त्यांचा हंगाम राबवला जातो, व त्यांचा काढणीचा कालावधी हा एप्रिल व मे महिन्यात पिकानुसार येत असतो. असे असले तरी, त्या वर्षातील थंडी, अवकाळी पाऊस, दुपारच्या कमाल तापमान ह्याच्या बदलानुसार रब्बी हंगामाचा १०० ते १२० दिवसांच्या कालावधी १० दिवसापासून २५ दिवसापर्यंत मागे-पुढे सरकतो. म्हणजेच या रब्बी हंगामाचे वय, कमी-जास्त होणे, किंवा पेरणी व काढणी लवकर उशिरा होणे, हे सर्व त्या वर्षातील एल-निनो, ला-निना, व एन्सो तटस्थेनुसार मागे-पुढे सरकतात. हवामान बदलानुसार प्रत्येक वर्षातील रब्बी हंगामाच्या कालावधीचे दोलनही मागे-पुढे हेलकावते.
            
फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत रब्बी पिके हुरडा अवस्थेत असतात. त्यानंतर धान्य दाण्यातील चिकाचे प्रमाण कमी होवून दाणा टणकतेकडे रूपांतरीत होत जातो, व पीक पक्व अवस्थेत काढणीसाठी परतवू लागते. सदर काळात पिकात शाखिय बदल जाणवू लागतात. पिकांचे प्रकाशसंश्लेषण कार्य व अन्नद्रव्ये पुरवठा कार्य मंदावते. अन्नद्रव्यसाठीची क्लोरोफीलची गरजही तशी संपत आलेली असते. म्हणून तर पानातील हिरवेपणा नाहीसा होत चालतो व पिकाची हिरवी पाने पिवळी होवून गळू लागतात.  निसर्गही  पिक उभे असलेल्या जमीन-मातीचे तापमान वाढवून, जमीन ओलावा कमी करत असतो. म्हणजेच नकळत पिकाच्या काढणीच्या तयारीस शेतकऱ्यांना तो मदत करत असतो.
                
म्हणून तर पेरणी अशाच कालावधीत करतात, कि जेंव्हा पीक परतणीचा काळ हा वेगवान कमाल तापमान वाढीच्या कालावधीशी साधारणपणे मॅच होईल. म्हणून तर तज्ञ शेतकऱ्यांना तो पेरणीचा कालावधी माहीत असतो. परंतु हवामानाने हे गणित जर बिघडवले की, पुढे पीक घेण्यासंबंधीच्या, काढणी व विक्रीसंबंधीच्या सर्वच विसंगती तयार होतात, व शेतकऱ्यांचे नुकसान होते. सध्या कमाल व किमान तापमानात सरासरी साधारण दीड ते दोन डिग्री से. ग्रेडने  वाढ ठेवून दक्षिण अर्ध महाराष्ट्रावरील १८ डिग्री दरम्यानच्या अक्षवृत्तवरील दोन्हीही कमाल व किमान तापमाने ही सध्या उर्वरित उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे २० ते २२ डिग्री अक्षवृत्तकडे सरकत आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या शेतपिकावरील परिणाम जाणवू लागला आहे.        

२०२४ च्या पूर्वार्धात,शेवटच्या टप्प्यात तीव्र होवून रेंगळणाऱ्या एल-निनोमुळे महाराष्ट्रातून थंडी लवकर गेली. त्याचा या वर्षीच्या रब्बी शेतपिकावर  परिणाम जाणवणारच आहे. हुरड्यावर आलेली सध्याची धान्यपिके एकाकी ओढून येऊन, वेगाने परतवू लागतील, आणि अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील. मात्र एल- निनोच्या वर्षात, आगाप ज्वारी, हरबरा व गहू पिकांसाठी ह्यावर्षीचे सध्याचे वातावरण साजेसे असुन ह्या आगाप पिकांवर थंडी लवकर नाहीशी होण्याचा विशेष असा कोणताही नकारात्मक परिणाम जाणवणार नाही. अश्या पिकांची वाढ पूर्ण होवून वेळेत काढणी होवून योग्य झड मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अश्या पिकांच्या उत्पन्नाला मागील वर्षातील अल्प पुरवठा काळातील चालत आलेला, चांगला वाढीव बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. 

परंतु मागास कांदा लागवड व मागास गहू पेरणी पिकांना वातावरण मारक ठरु शकते. उशिरातील उन्हाळ कांदा लागवड, व मागास पेरीतील गहू सारख्या पिकांची भर, झड(यील्ड) कमी होवून बंपर क्रॉपसारखा हंगामी उतार येणार नाही. म्हणून तर मागास पेर- लागवडीतील पिकांची सर्वच अंगानी ह्याबाबत काहीशी हेळसांड झालेली दिसेल.                

मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात जाणवणारा विशेष परिणाम-
                  
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक व मराठवाड्यातील उत्तर छ. सं. नगर अश्या (४+१)५ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे म्हणजेच ह्या ५ जिल्ह्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवत असे त्या ऐवजी अधिक ऊबदारपणा जाणवेल. म्हणजे थंडी तर लवकर गेलीच पण त्याऐवजीत्या ठिकाणी व काळात अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरवात होईल. मात्र उर्वरित दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अश्या ६ जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमानसरासरी इतकेच जाणवेल. 

येणाऱ्या पीक काढणीच्या काळात शेतकऱ्यांना अशीही सूचना करावीशी वाटते की, फेब्रुवारी- मार्च महिने हे गारपीट व अवकळी पावसाचे असतात. शिवाय ह्या दोन महिन्यातील मासिक अंदाजही वर्तवले आहेत. महाराष्ट्रातील पावसासंबंधीच्या अवस्था त्या-त्या वेळी अवगत केल्या जातीलच. परंतु या महिन्यातील पिकांची काढणीचा निर्णय करतांना शेतकऱ्यांनी हवामानाच्या सुचनांकडेही अवश्य लक्ष द्यावे, असे वाटते. 

लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ हवामान तज्ञ (सेवानिवृत्त) (भारतीय हवामान खाते, पुणे)

Web Title: Latest News Climate Change effect of temperature rise on rabi crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.