जळगाव :हतनूर धरणातून सिंचनासाठी (Hatnur Dam) आवर्तन सोडण्यात येते. यासाठी धरणाच्या उजव्या कालव्याचा वापर केला जातो. यंदा हतनूर धरणातून बिगर सिंचनाचे तापी पात्रात ७०० क्यूसेकने आवर्तन (Water Discharged) सोडण्यात आले तर शुक्रवारी २०० क्यूसेकने सिंचनासाठी यंदाचे चौथे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे शेतीसह पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.
यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने ८१.४३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. भुसावळ रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, अमळनेर धरणगाव, भुसावळ, यावल, सावदा या नगरपालिका बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसीसह १३० गावांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.
पाणी काटकसरीने वापरा
हतनूर धरणातून रिव्हर स्लुईद्वारे मध्य रेल्वे भुसावळ, नगरपालिका भुसावळ व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरकरिता बिगर सिंचनाचे आवर्तन मागणीनुसार २० रोजी ७०० क्युसेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आला आहे. बिगर सिंचनासाठी यंदाचे दुसरे आवर्तन आहे. तर शुक्रवारी कालव्याद्वारे सिंचनासाठीचे चौथे आवर्तन २०० क्युसेकने सोडल्याची माहिती हतनूरचे उपविभागीय अधिकारी एस. जी. चौधरी यांनी दिली. गतवर्षाच्या तुलनेत यंदा दोन टक्के कमी जलसाठा आहे. पाण्याचा वापर काटकसरीने काळजीपूर्वक करावा. असेही एस. जी. चौधरी यांनी सांगितले.
तापी नदीच्या पात्रामध्ये आवर्तन
हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी तापी नदीच्या पात्रामध्ये आवर्तन सोडण्यात येते. सिंचनासाठी कालव्याच्या माध्यमातून आवर्तन सोडण्यात येते. ममुराबादसह परिसरातील गावांना पाणीटंचाई होऊ नये, यासाठी आवर्तन सोडण्यात येते. धरणात अधिक प्रमाणात जलसाठा असेल तर मे महिन्यात बागायती कापूस लागवडीसाठी आवर्तन सोडले जाते.