नाशिक : बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) मोसम खोऱ्यासह मालेगाव तालुक्यातील काही गावांना वरदान ठरणाऱ्या हरणबारी धरणातून रब्बी हंगामातीलशेतीसिंचनाच्या (Rabbi season) आवर्तनासाठी दि. ७ मार्च पासून ४०० क्यूसेक इतक्या वेगाने दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे मार्च महिन्यातील तिसऱ्या पंधरवड्यापर्यंत सदरच्या आवर्तनाचा लाभ मोसम नदी परिसरातील शेतीसिंचनाला होत आहे.
बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर हे दोन्ही मध्यम लघु प्रकल्प म्हणून बागलाणमध्ये ओळखले जातात. हरणबारी धरणांचा (water Discharge) लाभक्षेत्र हे थेट मालेगावमधील काही गावांसाठी तर केळझर धरणातील पाण्याचा लाभ हा सटाणा शहरापर्यंत होते. रब्बी हंगामातील आवर्तनासोबतच उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या धरणातील जलसाठ्यांचा वापर एप्रिल-मे महिन्यांत करण्यात येत असतो. २५ फेब्रु.ते १० मार्चदरम्यान केळझर धरणातून शेतीसिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. यांचा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. आता एप्रिल अथवा में मध्ये शेवटचे आवर्तन मिळण्याची शक्यता आहे.
खाकुर्डी गावातील नदीपर्यंत पोहोचले पाणी..
आजमितीस खाकुर्डी गावापर्यंत नदीचे पाणी पोहोचले आहे. हरणबारी, जामोटी, ताहाराबाद, मुल्हेर, नामपूर, मोराणे, थेट खाकुर्डी वडेल बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचत असते. त्यांच्या पुढील पाणी हे मोसम राईस कॅनॉलपर्यंत जात असते. मोसम कॅनॉलवरून त्यांचे सिंचन होत असते. बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या लाभक्षेत्रापर्यंत हे पाणी पोहोचले आहे.
या पाण्यामुळे शेतीसिंचनाला मोठ्या प्रमाणात मदत होत असते. परिणामी, शेतकरी रब्बीसाठी या पाण्याची प्रतीक्षा करीत असतात. केळझर डाव्या कालव्याचे रब्बी आवर्तन दि. २५ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यान संपुष्टात आले आहे. हरणबारी धरणातील रब्बीचे दुसरे आवर्तन ७ मार्च ते साधारण २५ मार्चपर्यंत लाभक्षेत्रातील गावांना मिळणार आहे.
हरणबारी धरणातील दुसरे आवर्तन पूर्ण झाले आहे. जनतेच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उन्हाळ्यातील पाणीटंचाईसाठी पाणी शिल्लक ठेवण्यात येत असते. तिसरे आवर्तनदेखील पुढील महिन्यात शक्य आहे.
- शुभम चौधरी, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, बागलाण