निलेश साळुंखे
राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेचा कणा मानला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्याला विजेची टंचाई होऊ नये, यासाठी मागणीच्या प्रमाणात प्रकल्पातून सातत्याने वीजनिर्मिती केली जात असून, राज्याला मोठा दिलासा मिळत आहे.
सुरुवातीला वीजनिर्मितीसाठी निर्माण केलेला हा प्रकल्प सिंचन व वीजनिर्मितीसाठी उपयुक्त ठरत असून, १०५.२५ टीएमसी पाणसाठा क्षमता असलेल्या या धरणात १६ मार्च रोजी ६६.८३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत अर्थात पावसाळ्यापर्यंत राज्यासाठी दिलासादायक आहे.
कोयना धरणाचेपाणीवाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षानुसार केले जाते. यानुसार ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी आरक्षित असून त्यापैकी आतापर्यंत ३६.६९ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असून, ६६.८३ टीएमसी पाणीसाठातील मृतसाठा वगळता ६१.७१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी सुमारे ३१ टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी आरक्षित आहे.
दरवर्षी सिंचनासाठी सुमारे ३५ टीएमसी पाण्याचा वापर होत असतो. आतापर्यंत २०.२४ टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी झाला आहे. तसेच चालूवर्षी मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, उपलब्ध पाणीसाठा पाहता वीजनिर्मिती, सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने वाढत्या उन्हात सिंचन व वीजनिर्मितीचा 'संकटमोचक' म्हणून कोयना जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे.
जलविद्युत प्रकल्पातून एकूण १८५८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती
१ जून २०२५ पासून सुरू झालेल्या चालू तांत्रिक वर्षात १७ मार्चपर्यंत कोयना जलविद्युत प्रकल्पातून एकूण १८५८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. यामध्ये पश्चिमेकडील चार टप्प्यांमधून वीजनिर्मितीसाठी ३६.६९ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असून, त्यातून १६२० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. तर पूर्वेकडील पायथा वीजगृहातून सिंचन व पूरस्थितीत सोडलेल्या ३५ टीएमसी पाण्यापासून १६७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
नवीन उपकरणांचा वापर; कार्यक्षमता, उपलब्धता वाढली
• सुमारे ६५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला कोयना जलविद्युत प्रकल्प आजही प्रभावीपणे कार्यरत आहे. जुन्या यंत्रावर आधारित असलेल्या प्रकल्पातील मुख्य अभियंता, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पातून सातत्याने वीजनिर्मिती होत आहे.
• जुन्या यंत्रणांचे आधुनिकीकरण करून नवीन उपकरणांचा वापर करण्यात आल्यामुळे यंत्रणांची कार्यक्षमता आणि उपलब्धता वाढली आहे.
• त्यामुळे आजही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कोयना प्रकल्पाची स्थापित क्षमता १९५६ मेगावॉट असून त्याच क्षमतेने वीजनिर्मिती करण्याची क्षमता प्रकल्पात असल्याची माहिती 'महाजनको'चे पोफळी येथील मुख्य अभियंता एस. जी. चोपडे यांनी दिली.
