Join us

Koyna Dam Water; कोयना धरणातून सांगलीच्या सिंचनासाठी पाणी सुरूच.. किती उरला पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:51 IST

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. तर १५ दिवसांनंतर आपत्कालीन द्वारमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला.

त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी सातारा, सांगली जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने कोयनेतील पाण्याला मागणी वाढणार, अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे गेल्यावर्षी नोव्हेंबरपासूनच कोयनेतून पाणी विसर्ग सुरू झाला.

कोयनेतील पाण्यावर पिण्याच्या आणि सिंचन योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात तर सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचन मागणीत वाढ झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधूनही एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला.

या कारणाने सांगलीसाठी पायथा वीजगृह आणि आपत्कालीन द्वार असे दोन्हीकडील मिळून ३१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू होता. मात्र, गुरुवारपासून धरणाचे आपत्कालीन द्वार बंद करण्यात आले आहे. यामुळे सध्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत.

त्यातूनच २१०० क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. हे पाणीही सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठीच जात आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला आहे.

३१ मेपर्यंतचे नियोजन करावे लागणार• कोयना धरणात सध्या ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, हे पाणी ३१ मेपर्यंत पुरवावे लागणार आहे. या धरणातील पाण्यावर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. यामध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांचा समावेश आहे.• या योजनांसाठी पाणी विसर्ग करण्यात येतो. त्यातून शेकडो हेक्टर २ शेतीला फायदा होतो. तसेच पिण्याच्या पाणी योजनांनाही धरणातील पाणी सोडावे लागते.

टॅग्स :कोयना धरणशेतीशेतकरीपीकसांगलीपाणीमहाराष्ट्रसाताराटेंभू धरण