Join us

Koyna Dam: कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आणखी दीड फुटाने उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:18 IST

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी पाण्याची आवक प्रतिसेकंद ५० हजार क्यूसेकने सुरू आहे.

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी पाण्याची आवक प्रतिसेकंद ५० हजार क्यूसेकने सुरू आहे.

धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आणखी दीड फुटाने उचलत साडेदहा फूट केल्याने पाण्याच्या विसर्गात दहा हजार क्यूसेकने वाढ झाली आहे.

यामुळे कोयना नदीपात्रात पायथा वीजगृह व वक्री दरवाजे असा एकूण ५२,१०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. कोयना धरण व्यवस्थापनाने कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी कोयना नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोयना नदीकाठच्या हेळवाक गावातील एका घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतरित केले आहे, तर पाटणमधील १९ कुटुंबांना स्थलांतराचे आदेश दिले आहेत.

तसेच पूररेषा गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाटण शहरातील अनेक घरे व दुकानदारांनी साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे.

कोयना नदीकाठावरील पूररेषेत असणाऱ्या हेळवाक गावाची पाहणी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, हेळवाकचे सरपंच गजानन कदम यांनी केली.

अधिक वाचा: या ब्रिटिशकालीन धरणाचे ४५ स्वयंचलित दरवाजे उघडले पाणीसाठा शंभरीकडे

टॅग्स :कोयना धरणपाणीसाताराधरणनदीपाऊस