कोयनानगर : कोयना धरणाचे सध्याचे नाव शिवाजी सागर असून, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने यामध्ये तांत्रिक बदल करून कोयना धरणाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' असे करावे.
धरणाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
देवेंद्र तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यांनी तातडीने अहवाल मागवून त्यावेळचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे हा विषय प्रलंबित राहिला.
दि. १६ एप्रिल रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर दि. २३ डिसेंबर रोजीच्या भेटीत दोन दिवसात निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार दि. २६ डिसेंबर रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गुणाले यांना कोयना धरणाचे नाव बदलणे व प्रवेशद्वारावर अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्याची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
पाठपुराव्याला यश
गेली १० वर्षे सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने कोयना विभागात समाधानाचे वातावरण आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर यांचे नंदकुमार सुर्वे यांनी आभार मानले आहे.
अधिक वाचा: सहकार कायद्यामध्ये मोठे बदल होणार; शेती, साखर व दूध क्षेत्राला कसा होणार फायदा?
