Katepurna Dam Water : महान येथील काटेपूर्णा धरण (Katepurna Dam) मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के क्षमतेने भरल्याने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. पाटबंधारे विभागाने यंदा दहा हजार हेक्टरवर रब्बी हंगामाचे उद्दिष्ट ठेवले.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १० नोव्हेंबरपासून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे परवानाधारक शेतकऱ्यांबरोबरच बिगर परवानाधारक शेतकऱ्यांनाही फायदा झाला. (Katepurna Dam)
काटेपूर्णा धरणाच्या पाण्यावर अकोला, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्य बीजप्रक्रिया केंद्र आणि ६४ गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी अवलंब असतो. तसेच नदीकाठच्या परवानाधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी धरणाच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होतो. (Katepurna Dam)
खरिपाच्या नुकसानाची भरपाई रब्बीमधून
* यंदा पावसाने दिलेल्या झडपेमुळे खरिपात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
* झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना खर्चाची भरपाई मिळू शकली नाही. मात्र, रब्बी हंगामाच्या भरघोस उत्पादनामुळे त्यांना काही प्रमाणात नुकसान भरून काढता आले आहे.
शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ
धरणाचे पाणी सोडल्याने नदीकाठच्या शेतातील विहिरींमध्ये मुबलक पाणी साठले. परिणामी, शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, कांदा, केळी, भुईमूग, टरबूज आणि भाजीपाला यांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली. आजघडीला गहू आणि हरभरा वगळता इतर सर्व पिके बहरलेली दिसत आहेत.
शेतकरी काय सांगतात......
मी खरिपात सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद पेरले होते; पण जास्त पावसामुळे मूग आणि उडीद सडले. त्यामुळे मी रब्बीत नोव्हेंबरअखेर हरभरा आणि गहू पेरले आहे. - गणेश नानोटे, शेतकरी, निंभारा
गेल्या खरिपात शेतीला लावलेला खर्चही परत मिळाला नाही. आता रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली आहे, त्यातून काही तरी उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. - रवी महागावकर, शेतकरी, महान
खरीप हंगामात पावसामुळे बोंड्या सडल्या. त्यामुळे उत्पादन घटले आणि तोटा सहन करावा लागला. आता रब्बीत गव्हाची पेरणी केली आहे, त्यातून थोडाफार खर्च भरून निघेल, अशी आशा आहे. - अ. रशीद शे. कालू, शेतकरी, महान
खरिपात मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीचा खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे मी आता रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि कांद्याची लागवड केली आहे, यंदा तरी परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे. - मंगेश भांगे, शेतकरी, चिंचखेड