तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणीनदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याने संपूर्ण नदीवर पांढऱ्या शुभ्र फेसाचे जाड थर साचले असून, या विषारी पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. परिणामी हजारो मासे व जलचर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीतील प्रदूषण वाढतच असून, मागील दोन दिवसांत नदीवर बर्फाच्या चादरीसारखा फेस तरंगताना दिसत आहे. हा फेस इतका दाट आहे की संपूर्ण नदीपात्र झाकले गेले असून परिसरात उग्र वास पसरला आहे.
या विषारी पाण्यामुळे नदीतील नैसर्गिक परिसंस्थेला मोठा फटका बसला असून, नदीकाठी मोठ्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळून येत आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रदूषणामुळे इंद्रायणीतील जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या नदीची अशी अवस्था पाहून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
रसायनांच्या फेसामुळे नदीवर पसरलेली ही पांढरी चादर म्हणजे जणू इंद्रायणीने ओढलेली 'कफनचादर' असल्याचा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एकीकडे 'नमामि चंद्रभागा' आणि नदी सुधार प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात हजारो मासे तडफडून मरत असल्याचे विदारक चित्र आहे. आता केवळ पंचनाम्यांवर थांबू नये, तर इंद्रायणीला विष पाजणाऱ्या दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
इंद्रायणी नदी ही केवळ एक जलस्रोत नसून लाखो वारकरी आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वारंवार होणारे प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. जर ही रसायने सोडणे थांबवले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - उज्ज्वला दीपक काळे, नगरसेविका.
इंद्रायणी नदीची झालेली ही दुरवस्था अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या आपले रासायनिक सांडपाणी नदीत सोडत आहेत. यामुळे केवळ जलचरांचा मृत्यू होत नसून, लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार असून, दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. - प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष, आळंदी.
प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपले आहे का?
काही दिवसांपूर्वीही इंद्रायणी नदी अशाच प्रकारे फेसाळली होती. मात्र, त्यावेळी कागदोपत्री कारवाईखेरीज ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांचे प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Severe pollution in the Indrayani River near Alandi has killed thousands of fish. Chemical discharge created toxic foam, depleting oxygen levels. Locals are outraged, demanding action against polluting industries, fearing irreversible ecological damage to the sacred river.
Web Summary : आलंदी के पास इंद्रायणी नदी में प्रदूषण से हजारों मछलियाँ मर गईं। रासायनिक कचरे से जहरीला झाग बना, ऑक्सीजन कम हुई। स्थानीय लोग नाराज हैं, प्रदूषण फैलाने वाले उद्योगों पर कार्रवाई की मांग कर रहे हैं, पवित्र नदी को अपरिवर्तनीय क्षति का डर है।