घोड धरणावरून प्रस्तावित साकळाई योजनेला पाणीपुरवठा करू नये, या मागणीसाठी धरण लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हातील मढ़ेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. साकळाई योजना घोड धरणावर न राबवता सांडव्याद्वारे वाहून जाणाऱ्या पाण्यावर राबवावी, अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा स्मितल वाबळे यांनी दिला.
टिळक भोस यांनी म्हटले की, साकळाई योजनेचे पाप विद्यमान आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचे आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल, तर पुणे जिल्ह्यात अडवलेले आमचे हक्काचे पाणी घोड धरणात आणून दाखवावे. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये घोड धरण हे जुने व मातीचे असल्याने त्यावर अतिरिक्त ताण टाकू नये.
कुकडी प्रकल्पातून डिंभे- माणिकडोह बोगद्यातून वाहून जाणारे हक्काचे पाणी प्रथम मिळावे, तसेच सध्याच्या पाणीटंचाईमुळे तिसरे आवर्तन शक्य नसल्याने साकळाई योजना विसापूर धरणावरून राबवावी आदी मागण्या याप्रसंगी शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन घोड विभागाचे उपअभियंता मारुती ठणके यांना देण्यात आले. सूत्रसंचालन योगेश मांडे यांनी केले.
लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
या आंदोलनात मढेवडगावचे सरपंच प्रमोद शिंदे, श्रीनिवास घाडगे, तुळशीराम रायकर, रामभाऊ रायकर, सुभाष शिंदे, राजेंद्र नागवडे, राहुल जंगले, बापूसाहेब भुजबळ, महेश सूर्यवंशी, राहुल साळवे, अंबादास मांडे, अजय वाबळे, नीळकंठ जंगले, गोरख उंडे आदींनी मनोगते व्यक्त करत शासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
घोड वाचवा, शेतकरी जगवा असे फलक घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण