कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असून गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत धुवाधार पाऊस सुरू आहे.
राधानगरी धरणाचे सहा दरवाजे खुले झाल्याने १०,०६८ क्युसेक विसर्ग सुरु आहे. सर्वच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पंचगंगा नदीचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडले असून पाणीपातळी सोमवारी दिवसभरात दोन फुटांनी वाढली असून, ३२.०४ फुटांवरून वाहत आहे. तब्बल ५३ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
राधानगरी धरणाचे सर्व सातही दरवाजे सोमवारी खुले झाले होते. त्यातून ११ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला.
त्यामुळे सहा दरवाजातून ८,५६८ आणि पॉवर हाऊसमधून १५०० असा १०,०६८ क्युसेकने विसर्ग सुरू राहिला. यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे.
'कोयना' १०० टीएमसीकडे◼️ सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली.◼️ यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी रात्री अकरा वाजता दरवाजे पाच फुटांवरून सात फुटांपर्यंत उचलले.◼️ त्यामुळे कोयनेतून ४१ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.◼️ तसेच धोम, वीर आणि कण्हेर धरणांतूनही विसर्ग वाढविण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
अलमट्टीतून सव्वा लाख क्यूसेकने विसर्ग◼️ अलमट्टी धरणामध्ये सोमवारी ११७.८८ टीएमसी पाणीसाठा असून धरण २६ टक्के भरले आहे.◼️ धरणात ८२ हजार ९३२ क्युसेक पाणीची आवक होत आहे.◼️ धरणातून एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
अधिक वाचा: नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस 'वीर' धरणातून विसर्ग वाढवला; नीरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा