मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा या तिन्ही धरणांत नवीन पाण्याची आवकही वाढली असून, भंडारदरा ६० टक्के, तर निळवंडे ५० टक्के भरले.
या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या मोसमात जून महिन्यात विक्रमी पाऊस पडला. यामुळे ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
त्यातच मे महिन्यात सातत्याने झालेल्या पावसामुळे या धरणांमध्ये जून महिन्यातच नवीन पाण्याची आवक सुरू झाली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ६०.५८ टक्के झाला होता.
११ हजार ३९ दलघफू क्षमता असणाऱ्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा सायंकाळी ६ वाजता ६ हजार ७३२ दलघफूपर्यंत पोहोचला होता. या धरणातून मंगळवारी ८५० क्यूसेकने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
कळसूबाई शिखराच्या पर्वत रांगातही पावसाचा जोर वाढला असल्याने प्रवरेची उपनदी म्हणून समजल्या जाणाऱ्या कृष्णावंती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हे पाणी पुढे निळवंडे धरणात येत असते.
याबरोबरच भंडारदरा धरणातून येणारे पाणी आणि निळवंडे धरणाच्या पाणलोटात होत असलेल्या पावसाचे पाणी यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढला असून, सायंकाळी ६ वाजता या धरणातील पाणीसाठा ४ हजार २५८ दलघफू इतका झाला होता.
हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाचे प्रमाण टिकून असल्याने सायंकाळी ६ वाजता मुळेचा लहित (कोतुळ) जवळील विसर्ग ३ हजार ६१९ क्यूसेक इतका होता.
इतका पाऊस पडला
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी रतनवाडी १०२, घाटघर ८५, पांजरे ८३, भंडारदरा ७२, वाकी ६८, तर निळवंडे ३८ मिमी. इतका पाऊस नोंदला.
धरणांमध्ये वाढलेला साठा
भंडारदरा - ६०.५८%
निळवंडे - ५०%
अधिक वाचा: शेतजमिनींची कागदपत्रे मिळण्यासाठी राज्यात 'भू-प्रणाम' केंद्राची सुरवात; कोणती कागदपत्रे मिळणार?