लातूर जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. वादळी वाऱ्याने उसासह ज्वारीचे पीक भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वा. पर्यंत सरासरी ३१.४ मिमी पावसाची नोंद आहे. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून यात भादा मंडळात ९२.३, पानचिंचोली ७४, आष्टा ६७.५, देवणी ८२.३, बरोळ ७७.३ मिमी पाऊस झाला. या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने उसासह ज्वारीला फटका बसला आहे. हरभरा, तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.जिल्ह्यांत ३० नोव्हेंबरला तुरळक प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे.
विद्यापीठाच्या हवामान विभागाचा अंदाज
हिंगोली: रविवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाने सुरुवात केली. त्यानंतर सलग दोन दिवस पाऊस जोरदार झाला. चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी अवकाळी पावसाने उघडीप दिली. २८ नोव्हेंबरला रात्री हिंगोली, वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव, डोंगरकडा, केंद्रा, गोरेगाव, कौठा, आखाडा बाळापूर, डिग्रस कहाळे, आदी भागात जोरदार पाऊस झाला. बुधवारी पावसाने उघडीप दिली असली तरी थंड वारे मात्र वाहत होते. दरम्यान, 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव व इतर ७४, आष्टा- ६७.५, देवणी - ८२.३, बोरोळ- ७७.३ मिमी पाऊस झाला आहे.
वारा-पावसाने ऊस, ज्वारी आडवी
धाराशिव : जिल्ह्यात सलग दुसया दिवशीही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला आहे. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तोडणीला आलेला ऊस तसेच ज्वारी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. आठ मंडळात ३० मिमीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाली आहे. यात बेंबळी ३६.६, पाडोळी ३६.३, जागजी ३४.३. तुळजापूर ३६.५, सलगरा ३३.८. मंगरूळ ३९.८, इटकळ ४३.८ तर लोहारा मंडळात ३० मिमी पाऊस झाला. उर्वरित ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. मात्र, सोबतीला वादळी वारे झाल्याने धाराशिव, कळंब, वाशी, भूम व इतरही तालुक्यात प्रामुख्याने ऊस व ज्वारीचे नुकसान झाले. तुळजापूर तालुक्यात द्राक्ष, कांदा, भाजीपाला, उसावर वाऱ्याने संक्रांत आणली आहे.