Join us

सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पूरपरिस्थिती कायम तर पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:32 IST

गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारी (दि. ९) सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारी (दि. ९) सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीमुळे या तिन्ही तालुक्यातील बारावर मार्ग बंद असून, पूरपरिस्थिती कायम आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ८ वक्रकार दरवाजे ०.६ मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर बुधवारी (दि. ९) देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात पावसाचा जोर कायम होता, तर गोंदिया, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, तिरोडा या पाच तालुक्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६.६ मिमी पावसाची नोंद झाली, तर देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून, बारावर मार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद होते.

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली तर पुरामुळे केलेली रोवणीदेखील वाहून गेली. गेल्या तीन दिवसांपासून पिके पाण्याखाली असल्याने ती वाहून जाण्याची आणि सडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अतिवृष्टीमुळे धानपिकाच्या नुकसानीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

२७२ घरांची पडझड

गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आठही तालुक्यात २७२ घरे व ८४ गोठ्यांची गोठ्यांची पडझड झाली. तर दोन जनावरे पुरामध्ये वाहून गेल्याने नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी

३४.७३ - कालीसरार

३३.७१ - शिरपूर

४३.०२ - इटियाडोह

६७.३५ - पुजारीटोला

गेल्या २४ तासांत झालेला

तालुका झालेला पाऊस 
गोंदिया३५.८ मिमी
आमगाव ३२.५ मिमी
तिरोडा ५०.५ मिमी 
गोरेगाव ५३.०० मिमी
सालेकसा ४०.१ मिमी
देवरी १०४.५ मिमी
अर्जुनी मोरगाव ८९.६ मिमी
सडक अर्जुनी १२०.६ मिमी
एकूण ६६.६ मिमी

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसगोंदियाशेती क्षेत्रविदर्भशेतकरी