नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ जुलै या चार दिवसांत झालेली अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे ६ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ८ हजार ८८६ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक नुकसान कापूस व सोयाबीन पिकांचे झाले असून, त्या खालोखाल तूर व भात पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाचा नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यात ४०० ते ५०० कोर्टीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यातील मौदा, कामठी, नागपूर, सावनेर, उमरेड, भिवापूर व कुही या तालुक्यातील ३६१ वर गावे बाधित झाली आहेत.
मौदा तालुक्यात सर्वाधिक १ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला, धान पन्हे याचे मोठे नुकसान झाले आहे. कामठी तालुक्यात १ हजार ३७१ हेक्टर, तर कुही तालुक्यात १ हजार १६० हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.
नागपूर तालुक्यात ४१४, उमरेड ९४०, कुही ४५० हेक्टर क्षेत्रातील पीक बुडाले आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, या मुख्य पिकांसह धानाचे पन्हें, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाचा हा प्राथमिक अंदाज असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार ४०० ते ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
पुरामुळे जमीन खरडून गेली
पुरामुळे नदी व नाल्यालगतची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची जमीन पीक घेण्याजोगी राहिलेली नाही. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसानभरपाईची गरज आहे.
घरांची पडझड
पिकांच्या नुकसानीसोबतच अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील काही गावांत घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही गावांत रस्ते वाहून गेले आहे. काही गावांत महिनाभरापूर्वी करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांची अस्तित्वच संपले आहे.
शेतात पाणी साचले
अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली आहे आणि काही ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे खरीप हंगामव धोक्यात आला आहे.
नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या
प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान
तालुका | बाधित गावे | नुकसान |
नागपूर | ६३ | ४१४ |
कामठी | ३५ | १३७१ |
सावनेर | ४३ | ८३१ |
पारशिवनी | ४ | १४ |
मौदा | ९३ | १५८९ |
उमरेड | ४९ | ९४० |
भिवापुर | २२ | ४५० |
कुही | ५२ | ११६० |
एकूण | ३६१ | ६७६९ |
हेही वाचा : रेशीम शेती प्रयोगातून चमकले नशीब; संजय नाईकवाडे यांनी निर्माण केला शेतकऱ्यांपूढे आदर्श