आषाढ सुरू होऊन १० दिवस लोटले तरी श्रावणसरीच बसरत असल्या तरी आता पुढील चार दिवसांत मात्र धो... धो आषाढधारा कोसळतील, अशी आनंदाची बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
समुद्रसपाटीवरील वाऱ्याची द्रोणीय रेषा दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटभाग, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
रविवारसाठी मुंबई वगळून कोकणातील सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात सिंधदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरचा समावेश आहे; तर कोल्हापूर, सातारा, नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरील परिसरांनाही ऑरेंज, तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, ६ आणि ७ जुलै रोजी कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
घाट परिसरात जास्त पाऊस पडू शकतो; तर पुढील चार दिवस कोकणात, मध्य महाराष्ट्राच्या घाटभागात, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. ७ जुलै रोजी विदर्भात भंडारा व ७ आणि ८ जुलै रोजी गोंदियात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.