जळगाव जिल्ह्यात मंगळवार (दि.२७) जानेवारी रोजी झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि वादळी गारपिटीने रब्बी हंगामाला मोठा तडाखा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २१ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे २७ हजार ६३१ शेतकरी संकटात सापडले आहेत. पिके ऐन जोमात असताना अचानक आलेल्या अवघ्या ३५ मिनिटांच्या वादळाने शेतकऱ्यांच्या दोन महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये रब्बीतील प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले आहे.त्यासोबतच हरभरा, गहू, केळी, कांदा, बाजरी आणि ज्वारी ही पिकेही आडवी झाली आहेत. ४५५ गावांमधील शेतकरी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा विचार करता, एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, उभी पिके जमिनीला टेकली असून गारपिटीमुळे फळबागांनाही मोठी इजा झाली आहे. नुकसानीची तीव्रता पाहून कृषी विभागाकडून जिल्हाभरात बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान
| तालुका | बाधित गावं | बाधित शेतकरी | झालेले नुकसान (हेक्टरमध्ये) |
| जळगाव | २१ | ९८९ | ८३७ |
| भुसावळ | ४२ | १,३९० | ७३५ |
| यावळ | २९ | ७४६ | ५९१ |
| रावेर | ५७ | १,७३७ | १,६७७ |
| मुक्ताईनगर | ५४ | ६,२४३ | ४,६५८ |
| चोपडा | ५७ | ३,३५९ | ३,७२८ |
| एरंडोल | ६५ | ६,०२६ | ५,३९८ |
| धरणगाव | ५४ | २,१०० | १,२०७ |
| पारोळा | ६७ | ४,९५९ | २,९४५ |
| चाळीसगाव | ०९ | ८२ | ३१ |
पिकांचे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
| पीक | झालेले नुकसान |
| मका | ८,२१९ |
| गहू | ६,५७७ |
| ज्वारी | २,८२१ |
| केळी | २,१०२ |
| हरभरा | १,४०९ |
