उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण बुधवारी (दि. २४) १०० टक्के भरले आहे. या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ ते ६ प्रत्येकी ६० सें. मी.ने व ७ ते १४ हे प्रत्येकी ३० सें. मी.ने उघडले आहेत. धरणातून १९ हजार ८०८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने गिरणा धरणातील पाण्याची आवक वाढून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गिरणा धरणाची लेव्हल १३०५.९४ असून, २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेले गिरणा धरण निर्मितीनंतर १० वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. गिरणा धरणातील पाण्याच्या आवकेनुसार विसर्गाचे प्रमाण कमी अधिक केले जाईल. त्यामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने गिरणा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गिरणा धरण क्षेत्रात, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात जलद वाढ झाली आहे. गिरणा धरणातून नियमित होणाऱ्या आवर्तनामुळे मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, धरणगाव या भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. नांदगाव, मालेगावसह विशेषतः जळगाव जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.