परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठासह डोंगरपट्ट्यातील धरण व तलाव क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मासोळी मध्यम प्रकल्पाने शनिवारी संध्याकाळी शंभरी गाठली.
तसेच टाकळवाडी, कोद्री व तांदूळवाडी लघु तलावही १०० टक्के भरले. तर राणीसावरगाव तलाव भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. परिणामी गंगाखेड शहरासह धरण क्षेत्रातील १५ अवलंबित गावांच्या सिंचन व पाण्याचा प्रश्न, दुष्काळ अखेर संपला आहे.
मासोळी मध्यम प्रकल्प म्हणजे गंगाखेड शहरासह तालुक्यातील माखणी, इसाद, खोकलेवाडी, देवकतवाडी, चिलगरवाडी, सुप्पा (जहांगीर), सिरसम, डॉगरजवळा, पोखर्णी, सांगळेवाडी, आरबुजवाडी यासह परिसरातील किमान १५ गावांच्या पिण्याचे पाणी व सिंचनासाठी अत्यावश्यक असलेले धरण आहे.
यापैकी वरील नमूद गावांसाठी १ दलघमी, गंगाखेड शहराच्या टाकळवाडीच्या पाण्यासाठी ३.३८६ दलघमी तर जी-७ शुगर कारखान्यासाठी २ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. मासोळी मध्यम प्रकल्प धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.०८१ दलघमी एवढी आहे तर कार्यक्षेत्रातील शेतजमिनीची सिंचन क्षमता साधारणतः १८०० हेक्टर एवढी आहे.
तांदूळवाडी लघु तलाव क्षेत्रांतर्गत तांदूळवाडी, डोंगरगाव, हाकेवाडी, बनवस, महादेव वाडी, सिरसम या गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा आधार आहे.
शंभर टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या राणीसावरगाव लघु तलाव अंतर्गत राणीसावरगावासह कांगणेवाडी, राणीसावरगाव तांडा या परिसरास लाभहोणार आहे. एकंदरीतच मागील दोन ते चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी पट्टयासह डोंगरी परिसरातील क्षेत्रात पाणीच पाणी झाल्याने तालुका पाणीदार झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.
खरीपातील पिकांना फायदा
तालुक्यातील टाकळवाडी, कोद्री व तांदूळवाडी हे तीन लघु तलाव शंभर टक्के भरले आहेत. तर राणीसावरगाव तलाव भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. टाकळवाडी लघु तलाव अंतर्गत टाकळवाडी, गुंजेगाव, घटांग्रा, पांगरी व वरवंटी या गावांना पिण्याची मदत होणार आहे. कोद्री लघु तलाव अंतर्गत कोद्री, उंडेगाव, डोंगरगाव, डोंगरजवळा आदी गावांना पिण्याचे पाणी, सिंचनाचे फायदे होणार आहेत.
जवळपास १८०० हेक्टर शेत सिंचनाखाली
मासोळी मध्यम प्रकल्प धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.०८१ दलघमी एवढी असून या धरणाच्या कार्यक्षेत्रातील जवळपास १८०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. यंदा धरण शंभर टक्के भरल्याने या क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र