छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो झाले होते. मात्र, अद्याप शेतीसाठी धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (दि. ८) दुपारी उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील बोरसर, खिर्डी, मनूर, साळेगाव, भोकरगाव, मालेगाव क., पोखरी, वाघला, शिवगाव, बाभूळगाव, पाथरी, भायगाव, धोंदलगाव या गावांसह तीस ते चाळीस गावांतील शेतकऱ्यांनी शिवना टाकळी धरणाच्या भरवशावर रब्बी हंगामातील पिके घेतली आहेत.
पण फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी पाणी सोडले नव्हते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार रविवारी (दि.०८) फेब्रुवारी रोजी अखेर उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
४ हजार ५०० हेक्टर शेती ओलिताखाली
शिवना टाकळी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने ४५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून, यापैकी तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात गहू, हरबरा, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, अद्रक, ऊस आदी पिकांची लागवड केली आहे. आतापर्यंत पिकांना विहिरींचे पाणी दिले जात होते. मात्र, आता विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते.
