जळगाव जिल्ह्याच्या कुऱ्हाड (ता. पाचोरा) परिसरातील शेतीसाठी म्हसाळा लघु पाटबंधारे जलाशयाचे पहिले पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले. यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने या भागातील धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली होती. त्याअनुषंगाने कुन्हाड, वाकडी, कोकडी आदी परिसरात यावर्षी शेती सिंचनासाठी म्हसळा धरणातून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.
या धरणक्षेत्रात जवळपास दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली येत असते. यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, गहू, हरभरा आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. या पिकांना पाण्याची गरज भासत असताना म्हसाळा जलाशयाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले.
दरम्यान, यंदा पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे उशीराने हाती घेण्यात आली. ती कामे आटोपण्यास उशीर झाल्याने यंदा पहिले आवर्तन देण्यास जानेवारी महिना उजाडला. दरवर्षी, डिसेंबर महिन्यात हे आवर्तन दिले जाते. शेतकरी गेले महिनाभर या आवर्तनाची वाट पाहत होते. आता आवर्तन मिळाल्याने रब्बी हंगामाला 'बुस्टर' डोस मिळाला असून शेतकऱ्यांचा जीवही भांड्यात पडला आहे. यंदा धरणात पाणीसाठा चांगला असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगाम लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.
म्हसाळा धरणावर पाण्याचे आवर्तन सुटण्याअगोदर दरवर्षी खोडसाळपणा केला जातो. पाणी सुरू होण्याअगोदर धरणाच्या गेटचा रॉड कापून ठेवल्याने पाणी उशिराने सुटले. धरणावर सुरक्षा रक्षक नेमल्यास नुकसान होणार नाही. - तानाजी पाटील, शेतकरी, कुन्हाड खुर्द.
शेतकऱ्यांनी पाणी कराची थकबाकी वेळेत भरावी!
पाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कराची थकबाकी शेतकऱ्यांनी वेळेत भरावी जेणेकरून आवर्तनाची कामे वेळेत करता येतील, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी दिवाळी झाल्यानंतर रब्बी हंगामासाठी पाण्याच्या आवर्तनाचे अर्ज व थकबाकी नियमित भरल्यास पाणी सुटण्यास उशीर होणार नाही. शासनाने ठिकठिकाणी पाणी वापर संस्था उघडल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी या संस्था बंद पडल्या असून त्या पुनर्जीवित केल्यास सर्व कामकाज या संस्थेमार्फत चालून शेतकऱ्यांना वेळेवर आवर्तन मिळून शकेल. - किशोर देशमुख, शाखा अभियंता, पाचोरा.
आवर्तन सोडताना या मान्यवरांची उपस्थिती
म्हसाळा धरणाचे आवर्तन मसलन पाचोरा उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, शाखा अभियंता किशोर देशमुख, कालवा निरीक्षक स्वप्नील महाजन, सरपंच शिवाजी पाटील, डॉ. प्रदीप महाजन, जगदीश तेली, तानाजी पाटील, रवींद्र चव्हाण, संतोष पाटील, समाधान पाटील व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
सध्या रब्बीची पिके उत्तम वाढीस असताना तसेच त्यांना पाण्याची नितांत गरज असताना यावर्षी धरणाचे पाणी एक महिनाभर उशिराने सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर
