गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी दुपारी ३:३० वाजता रब्बी हंगामासाठी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालव्यात ५० क्युसेस पाणी सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भडगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, या पाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा लागली होती. अखेर आवर्तन सुरू झाल्याने चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कालवा व पाटचाऱ्यांच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या कामामुळे पाणी मिळण्यास सुमारे सव्वा महिन्याचा विलंब झाला.
यंदा गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने जामदा उजवा व डावा कालव्याला रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. मात्र, कालव्या व पाटचाऱ्यांमध्ये काटेरी झुडपे वाढणे, अस्वच्छता, काही पाटचारी जमिनदोस्त होणे तसेच अतिवृष्टीमुळे वाडे, बांबरूड प्र. ब. व गोंडगाव परिसरात उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला होता.
दुरुस्ती कामामुळे आवर्तनास विलंब
उजवा व डावा कालवा तसेच पाटचाऱ्यांची दुरुस्ती व स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर हाती घेतली. या कामांमुळे कालव्यांना पाणी सोडण्यास विलंब झाला.
गोंडगावात कालव्याला भगदाड, पाण्यास अडथळा
५० क्युसेस वेगाने पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. उजव्या कालव्यालाही बुधवारी पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांची कामे सुरू झाली आहेत.
गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याला रब्बी हंगामासाठी तीन पाण्याची आवर्तने जाहीर करण्यात आली आहेत. कालवे व पाटचाऱ्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, बुधवारी दुपारी ३:३० वाजता ५० क्युसेसने पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. - सुभाष चव्हाण, शाखा अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, भडगाव.
रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू
• डाव्या पांझण मुख्य कालव्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर १८ रोजी सकाळी १० वाजता ५० क्युसेसने पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. डाव्या कालव्याच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत.
• उजवा कालवा व पाटचाऱ्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे २४ रोजी दुपारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर अखेर दुपारी ३:३० वाजता गिरणा जामदा बंधाऱ्यातून उजव्या कालव्याला ५० क्युसेसने पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले.
