रामेश्वर काकडे
नांदेड : मागील काही दिवसांपासून ऊन तापण्यास सुरुवात झाली असून काही तालुक्यांत आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. पण, नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतील प्रकल्पात सद्य: स्थितीला मागीलवर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना सध्यातरी सिंचनासाठी काळजी करण्याचे कारण नसल्याचे दिसून येते. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना सोसाव्या लागतात.
अनेकदा स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकांकडून पाणी (Water) वितरणाचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही, त्याचा फटका नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. यंदा मात्र नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ येथील धरणांत आजघडीला ७४.५६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा (Water Reservoir) आहे. त्यामुळे यंदा पाणी वितरणाचे नियोजन व्यवस्थित केल्यास पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही. तसेच शेतीसाठीही ठरावीक पाणीपाळ्या वेळेवर मिळतील, अशी स्थिती आहे.
जिल्ह्यातील धरणांत असलेला पाणीसाठा
नांदेड जिल्हा- मानार प्रकल्प ६८ टक्के, विष्णुपुरी प्रकल्प ६८.३५ टक्के, मध्यम प्रकल्प ६७ टक्के, उच्च पातळी बंधारे ५८ टक्के, लघु प्रकल्प ५२ टक्के, हिंगोली जिल्हा- सिद्धेश्वर प्रकल्प ६० टक्के, लघु प्रकल्प ३४ टक्के, कोल्हापुरी बंधारे ५३ टक्के, परभणी जिल्हा- येलदरी ८२ टक्के, उच्च पातळी बंधारे ६७ टक्के, लघु प्रकल्प ८३ टक्के, कोल्हापुरी बंधारे ८८ टक्के याप्रमाणे जिल्ह्यातील धरणांत पाणीसाठा उपलब्ध आहे.
इसापूर धरणात ८२ % पाणीसाठा
नांदेडसह तीनही जिल्ह्यांतील सिंचनासाठी (Irrigation) महत्त्वपूर्ण असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर या धरणात ६ फेब्रुवारी रोजीचा ८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, तर गेल्यावर्षी याच तारखेत ६४.६६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी स्थिती आहे.
मागील वर्षी होता ५५ टक्के उपयुक्त साठा
नांदेड, यवतमाळ, हिंगोली व परभणी या चार जिल्ह्यांतील धरणांत आजघडीला ७४.५६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, मागील वर्षी याच दिवशी सरासरी ५५ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे मे-जून महिन्यांत अनेक तालुक्यांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या, पण यंदा मुबलक पाणीसाठा आहे.