Join us

दमदार पावसाची अपेक्षा ठरली फोल; शेतकऱ्यांना आता लागली श्रावण सरींची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:36 IST

पावसाळ्याचे दोन महिने ऊन-सावलीच्या खेळात निघून गेले. दमदार पाऊस मात्र बरसलाच नाही. भिज पावसाच्या बळावर पीक परिस्थिती उत्तम असली तरी पिकात तण व रोगराई मात्र जोमात आहे. आता श्रावण सरी तरी जोरदार बरसतील, अशा आशेत शेतकरी आहे.

पावसाळ्याचे दोन महिने ऊन-सावलीच्या खेळात निघून गेले. दमदार पाऊस मात्र बरसलाच नाही. भिज पावसाच्या बळावर पीक परिस्थिती उत्तम असली तरी पिकात तण व रोगराई मात्र जोमात आहे. आता श्रावण सरी तरी जोरदार बरसतील, अशा आशेत शेतकरी आहे.

परिसरात मे महिन्यात उन्हाळी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस बरसल्याने व जून महिन्याच्या सुरुवातीला भिज पाऊस बरसल्याने पावसाळी कपाशी, मका, ज्वारी, बाजरी पेरणीही उरकण्यात आली.

परिसरात अधूनमधून पडणाऱ्या भिज पावसामुळे पीक परिस्थिती उत्तम असली तरी दमदार पाऊस न बरसल्याने पिकांची वाढ मात्र खुंटली आहे. काही दिवसात पाऊस न झाल्यास पिके धोक्यात येणार अहेत.

पिकांची वाढ खुंटली, भिज पावसाचीही पाठ

• जळगाव जिल्ह्याच्या महिंदळे (ता. भडगाव) परिसरात पावसाची सुरुवात भिज पावसाने झाली. दमदार पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे अजूनही परिसरातील नाले, केटीवेअर, पाझर तलाव, विहिरी अजूनही कोरडेच आहेत. दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढही खुंटली आहे.

• आता तर दहा ते बारा दिवसापासून भिज पावसानेही पाठ फिरवल्याने हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके माना टाकायला लागली आहेत. ज्या शेतकऱ्याकडे थोडेफार पाणी आहे ते पिकांना देताना दिसत आहेत.

• पिके आता दोन महिन्यांची होत आल्याने शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खते दिली आहेत; परंतु दमदार पाऊस नसल्याने खते अजून जमिनीवर पडली आहेत. पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

महिंदळे परिसरात सुरुवातीपासून भिज पाऊस बरसत आहे. हा पाऊस पिके लहान होती, तोपर्यंत उपयोगी होता; परंतु पिके आता दोन महिन्यांची होत आल्याने पिकांना पाणी जास्त लागणार आहे. ते न मिळाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. श्रावण महिन्यात वरुणराजा चांगला बरसल्यास उत्पन्न येईल अन्यथा खर्चही निघणार नाही. - नवल देवरे, शेतकरी, महिंदळे.

पोयाले देव भोया व्हस

• पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी परिसरात दमदार पाऊस बरसला नाही. आता श्रावण महिना सुरू होत आहे. शेतकऱ्याचा सण बैल पोळा झाल्यावर पाऊस भोळा होतो. म्हणजे पाऊस परतीच्या मार्गावर असतो, असे जाणकार सांगतात.

• आता शेतकऱ्यांना श्रावण महिन्यातील पावसाची अशा आहे. या महिन्यात तरी पावसाची तूट भरून निघेल, अशी आशा आहे. श्रावण महिन्यात तरी तूट भरून निघाल्यास उत्पन्न येईल अन्यथा उत्पन्नात मोठी घट येणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनहवामान अंदाजपाणी