Join us

निळवंडे धरणातील पाणी पातळी कमी झाल्यावरही कालव्यांद्वारे मिळणार पाणी; केला हा नवीन प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:11 IST

निळवंडेच्या ६१४ तलांकवरून केवळ अकोले तालुक्यासाठी असलेल्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांसाठी धरणाच्या तळाला पोटात तयार केलेली उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. या योजनेद्वारे गरजेनुसार कालव्यासाठी पाणी सोडता येणार आहे.

अकोले : निळवंडेच्या ६१४ तलांकवरून केवळ अकोले तालुक्यासाठी असलेल्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांसाठी धरणाच्या तळाला पोटात तयार केलेली उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. या योजनेद्वारे गरजेनुसार कालव्यासाठी पाणी सोडता येणार आहे.

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांद्वारे तालुक्यातील सुमारे २ हजार ३२८ हेक्टर क्षेत्राला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी जलसंपदा विभागाने उपसा सिंचन योजनेची सुविधा निर्माण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेनुसार उच्चस्तरीय कालव्यांना आता उपसा सिंचन योजनेद्वारे ६१४ मीटरच्या खाली पाणीपातळी आल्यावरही कालव्यांना पाणी देणे शक्य होणार आहे, असे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी सांगितले.

निळवंडे प्रकल्पाच्या उच्चस्तरीय कालव्यांचा लाभ तालुक्यातील डाव्या कालव्यांवरील ८७१ हेक्टर आणि उजव्या कालव्यावरील १ हजार ४५७हेक्टर क्षेत्रांना होतो. हे उच्चस्तरीय कालवे निळवंडे जलाशयाच्या ६३० मीटर तलांकवरून निघतात.

धरणात जेव्हा पाणीसाठा ६४८.१५ मीटर ते तलांक ६३० मीटर दरम्यान असतो, तेव्हाच उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देणे शक्य होत होते तसेच यामध्येही उच्चस्तरीय कालव्यावरील काही आऊटलेट बंद पडत असल्याने उच्चस्तरीय कालव्याच्या लाभक्षेत्रात पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने होऊ शकत नव्हता. शेतकऱ्यांच्या मागणीवरून उपसा सिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे.

प्रयोग यशस्वी; शेतकऱ्यांना दिलासाउच्चस्तरीय कालव्यांसाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्याने ६१४ मीटरच्या वर पाणी पातळी असूनही उच्चस्तरीय कालव्यांना आता पाणी देणे शक्य होणार असल्याचे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठकारे, कार्यकारी अभियंता धरण विभाग प्रदीप हापसे, उपअभियंता प्रमोद माने यांनी या उपसा सिंचन योजनेचा प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

अधिक वाचा: PM Kisan Hapta : किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; कधी मिळणार हप्ता?

टॅग्स :धरणपाणीशेतीशेतकरीपाटबंधारे प्रकल्पअहिल्यानगरअकोलेराधाकृष्ण विखे पाटील