महाराष्ट्रात स्थापनेनंतर पहिल्यांदाच बांधण्यात आलेल्या परभणी जिल्ह्याच्या येलदरी येथील जलविद्युत प्रकल्प विक्रमावर विक्रम स्थापन करीत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात जलविद्युत प्रकल्प ६१ दिवस अखंडितपणे सुरू ठेवत पुराच्या पाण्यातून वीजनिर्मिती करत तब्बल १३.५० कोटी रुपये ऊर्जा विभागाला कमातून दिले.
यंदा येलदरी धरण १५ ऑगस्टला शंभर टक्के भरले. त्यामुळे जलसंपदा विभागाने अतिरिक्त येणारे पाणी पूर नियंत्रणासाठी सर्वप्रथम येथील जलविद्युत प्रकल्पाच्या जनित्रामधून सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार येथील जलविद्युत केंद्राने वीजनिर्मिती प्रकल्प सुरु केला.
या वीजनिर्मिती केंद्राची स्थापित वीजनिर्मिती क्षमता २२.५ मेगावॉट एवढी असून दोन महिन्यांच्या कालावधीत या निर्मिती केंद्राने तब्बल २४ मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करून मोठा विक्रम स्थापित केला आहे.
५७ वर्षांपासून कार्यरत
जलसंपदा विभागाने या येलदरी जलविद्युत प्रकल्पाचे आयुर्मान केवळ ३५ वर्षे एवढे दाखवले आहे. मात्र, आजही हा प्रकल्प नवीन प्रकल्पांच्या तोडीस तोड पद्धतीने काम करत आहे. दोन महिन्यांत तब्बल २४ मेगावॉट वीजनिर्मिती करून घसघशीत राशी ऊर्जा विभागाला मिळवून दिली आहे.
मग खासगीकरणाचा घाट कशासाठी?
सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे काही प्रमाणात नूतनीकरण आवश्यक झाले आहे. मात्र, हा प्रकल्प जुना झाल्याने या प्रकल्पाचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प खरच नूतनीकरणासाठी आवश्यक आहे का, याचा आढावा ऊर्जामंत्री मेधना बोर्डीकर यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन घ्यावा, अशी मागणी होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही प्रकल्प मजबूत
यंदा प्रचंड पाऊस पडल्यामुळे अनेकवेळा येलदरी धरणातून १० दरवाज्यांतून पाणी सोडावे लागले. अशा कठीण प्रसंगात देखील येलदरी येथील कार्यकारी अभियंता यू. एस. पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. ए. जांबुतकर, अभियंता, तंत्रज्ञ संवर्गातील कर्मचारी, बाहास्त्रोत कर्मचारी आदी वीजनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत.
ऊर्जा विभागाकडून पाण्याचा पुरेपूर वापर
१० ऑक्टोबरला पावसाळा संपला असला तरी अजूनही एक युनिट सुरूच आहे. धरणात येणारी अतिरिक्त पाण्याची आवक पूर नियंत्रणासाठी पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यातून सोडलेल्या पाण्याचा ऊर्जा विभागाने पुरेपूर वापर करत वीजनिर्मिती १४ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १३.५० कोटी रुपये नफा कामावला आहे.