Join us

खडकवासला धरणातून विसर्ग थांबवला; यंदा जुलैमध्येच पाणीसाठा पोहचला विक्रमी टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 09:15 IST

Khadakwasla Dam Water Update : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने तसेच पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून होत असलेला विसर्ग थांबवण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने तसेच पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून होत असलेला विसर्ग थांबवण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. आतापर्यंत खडकवासला धरणातून पाच टीएमसी पाणी मुठा नदीत विसर्गाद्वारे सोडले आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत ७१ टक्के अर्थात सुमारे २१ टीएमसी पाणी जमा झाले आहे. गेल्या वर्षी हा साठा सुमारे आठ टीएमसी (२७ टक्के) इतका होता.

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत होत असलेला विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने शुक्रवारी मुठा नदीत सुरू असलेला ६५४ क्युसेक विसर्ग दुपारी पूर्णपणे बंद केल्याची माहिती उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली.

खडकवासला धरण भरल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच टीएमसी पाणी नदीत विसर्गाद्वारे सोडण्यात आले आहे. दरम्यान चारही धरणांमिळून आतापर्यत २०.८७ टीएमसी अर्थात ७१.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा ७.८७ टीएमसी अर्थात २६.९८ टक्के इतका होता.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच मान्सूनने लवकर हजेरी लावल्याने या चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील अडीच महिन्यांत पावसाचा जोर असाच राहिल्यास विसर्गाद्वारे आणखी पाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट केले. सध्या खडकवासला प्रकल्पात सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

धरणांतील पाण्याची स्थिती

धरण टीएमसी टक्के 
खडकवासला१.१५ ५८.१६
पानशेत ७.५३ ७०.७५ 
वरसगाव ९.७४ ७५.९९ 
टेमघर २.४५ ६५.९७ 
एकूण २०.८७ ७१.५९ 

गेल्या वर्षाच्या तुलनेत आजची स्थिती अशी

टीएमसी - ७.८७

टक्के - २६.९८

पाण्याची आवक - ८२ दशलक्ष घनफूट

आतापर्यंत मुठा नदीत सोडण्यात आलेले पाणी - ५.०५ टीएमसी

हेही वाचा :  जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :पुणेपाणीजलवाहतूकपाऊसधरणनदीशेती क्षेत्र