वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात १ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे येथील काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
सोमवार, १ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणातील पाणीपातळी ९७.३२ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यावेळी दोन गेट उघडण्यात आले. मध्यरात्री वाढत्या आवकमुळे ३:३० वाजता आणखी दोन गेट, तर पहाटे ४:३० वाजता चार गेट उघडून एकूण आठ गेटमधून विसर्ग सुरू करण्यात आला.
त्यानंतर २ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता उर्वरित दोन गेट उघडून सर्व दहा गेटमधून पाणी सोडण्यात आले. २ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने, परिस्थिती लक्षात घेऊन विसर्ग कमी-जास्त करण्याचा निर्णय वेळोवेळी घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार!
मालेगाव, डव्हा, काटा, कोंडाला, जऊलका रेल्वे, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा, फेट्रा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली होती.
महान येथील गावठाण पाण्याखाली
• धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्गामुळे काटेपूर्णा नदी दुथळी भरून वाहत असून, नदीचे पाणी महान येथील गावठाण पाण्यात बुडाले होते.
• नदी काठावरील येणाऱ्या गावातील जनतेला सतर्क राहण्याचे आणि नदी पात्रातून कोणीही जाणे येणे टाळावे असे आवाहन महान पाटबंधारे विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
• वाढत्या पाणी पातळीकडे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे, कर्मचारी मनोज पाठक हे लक्ष ठेऊन नियोजन करीत आहे.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र