सूर्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील गावांना ३० डिसेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; तर दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे.
सूर्या प्रकल्पाच्या डाव्या तीर कालव्याच्या पहिल्या टप्प्यातील सात किलोमीटर कालव्याचे अस्तरीकरण झाल्यानंतर कालव्याच्या प्रवाहाला गती मिळाली असून सध्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचवणे शक्य झाले आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळी भात या पिकवण्यासाठी पाण्याचा उपयोग होणार आहे. पाटबंधारेकडून कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अस्तरीकरण करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. त्यातील पहिल्या सात किलोमीटर टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
गाळ काढण्यासह दुरुस्तीचे काम पूर्ण
• डाव्या तीर मुख्य कालव्याची एकूण लांबी २९ किलोमीटर आहे. सध्या मुख्य कालव्याच्या १ ते ७ किलोमीटरपर्यंतच्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. उजव्या तीर कालव्याची एकूण लांबी ३३ किलोमीटर इतकी आहे.
• या कालव्याच्या पहिल्या १ ते ७ या सात किलोमीटरपर्यतच्या टप्प्याचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यासाठी काम प्रस्तावित आहे. मुख्य कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी लघु कालव्याचा उपयोग केला जातो.
हेही वाचा : कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर
