बाळासाहेब माने
धाराशिव : यंदा समाधानकारक पाऊस होऊनही फेब्रुवारीतच जिल्ह्यातील प्रकल्पातील उपयुक्त साठा ५० टक्के उपलब्ध आहे. ऑक्टोबरअखेर तुडुंब असलेले प्रकल्प फेब्रुवारीत निम्म्यात आले आहेत. उपलब्ध साठा संरक्षित केल्यास मे अखेरीस पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार नाही.
चोरटा उपसा झाल्याने एप्रिलपासूनच प्रकल्पालगतच्या गावांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वातावरणातील बदलामुळे यंदा पाच महिने पावसाळा झाला. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत सर्वच प्रकल्प तुडुंब भरलेले होते; मात्र डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांत तुडुंब असलेल्या प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे.
१४ फेब्रुवारीच्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील लहान-मोठ्या २२६ प्रकल्पात जवळपास ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Reservoir) आहे.
अवघ्या तीन महिन्यांत प्रकल्पातील पाणी निम्मे कमी झाले आहे. ५५ लहान-मोठे प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच धाराशिव जिल्ह्यात टंचाई निर्माण होण्याची शक्यता.
५० टक्के पाण्यावर उर्वरित उन्हाळ्याचे साडेतीन महिने काढावे लागणार आहेत. उपलब्ध पाण्याचा (Water) जपून वापर केल्यास आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. यासाठी प्रशासनाने प्रकल्पातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याची चोरी झाल्यास एप्रिलमध्येच प्रकल्पालगतच्या गावांना पाणीटंचाईचे (Water Shortage) चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या काही भागातील विहिरीसह कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. यापूर्वी कधीच फेब्रुवारीत तळ न दिसणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. एप्रिल, मेमध्ये दम तोडणारे बोअर फेब्रुवारीतच कमी येत आहेत.
मोठ्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी वाहून गेल्याचे काही जाणकार सांगतात. तसेच यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी केली. त्याप्रमाणे अनेक प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.
यापूर्वी रब्बी हंगामातील प्रकल्पातील पाणी सोडण्याची गरज पडत नव्हती. यामुळे पाण्याची बचत होत होती. याचा फायदा उन्हाळ्यात पिण्यासाठी व शेतीसाठी होत होता. यंदा रब्बी हंगामातच ५० टक्क्के पाण्याचा वापर झाला आहे.
बाणगंगा, रामगंगा, संगमेश्वर ५० टक्क्यात...
सर्वाधिक पाऊस झालेल्या भूम तालुक्यातील बाणगंगा, रामगंगा, संगमेश्वर मध्यम प्रकल्प ऑक्टोबर अखेर तुडुंब भरलेले होते; मात्र दोन महिन्यांत ५० टक्क्यात आले आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
बाणगंगा व रामगंगा प्रकल्पात पाणी नसल्याने परिसरातील विहिरीसह कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
विहिरींनी तळ गाठला...
दुष्काळातही परिसरातील विहिरींनी मार्च, एप्रिलपर्यंत तळ गाठला नव्हता. यंदा चांगला पाऊस होऊनही फेब्रुवारीतच विहिरींनी तळ गाठला आहे. मोठ्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरले नाही. यामुळे विहिरींनी फेब्रुवारीतच तळ गाठला. - सुरेंद्र झांबरे, शेतकरी.
यापूर्वी शेतीसाठी रब्बी हंगामात प्रकल्पातील पाण्याची मागणी होत नव्हती. यंदा पाऊस चांगला होऊनही रब्बीत पाण्याची मागणी झाली. पुरवठा झाल्याने रब्बीत पाण्याची बचत झाली नाही. यामुळे साठा घटला. - अजित मदने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.
चांदणी ४० टक्क्यांत; खंडेश्वरी, साकत कोरडे...
* आठ तालुक्यांपैकी परंडा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे फेब्रुवारीतच परंडा तालुक्यातील खंडेश्वरी, साकत मध्यम प्रकल्प कोरडे दिसत आहेत.
* चांदणी प्रकल्प ४० टक्क्यांत आला आहे.
बीड जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थिती
बीड जिल्ह्यातील लहान-मोठ्या अशा एकूण १४३ धरणांमध्ये सद्यस्थितीत ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे बीडकरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही.
सध्या बाष्पीभवनाचा वेग कमी असला तरी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित नगरपालिकांनी आत्तापासूनच पाणी सोडण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
२०२४ मधील जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत फारसा मोठा पाऊस झाला नव्हता. जून महिन्यापासून रिमझिम पाऊस झाला. नंतर मोठ्या प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्या करता आल्या नव्हत्या. त्यानंतर जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली होती. याच कालावधीत बिंदुसरा प्रकल्प ओसंडून भरून वाहू लागला होता.
त्यानंतर हळूहळू माजलगाव धरण भरत गेले. टप्प्याटप्प्याने चांगला पाऊस झाल्याने जवळपास १४३ लहान-मोठी धरणे भरली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा
दिलासा मिळाला.
शेवटच्या टप्प्यात अधिक पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु, मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामामध्ये कोणत्याही ठिकाणी पाण्याची अडचण निर्माण झाली नाही.
त्यामुळे रब्बीची पिके चांगली बहरली आहेत. जिल्ह्यातील लहान-मोठ्या अशा एकूण १४३ धरणांमध्ये सद्यस्थितीला ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे बीडकरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही.
७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेले सहा प्रकल्प आहेत. १०० टक्के पाणीसाठा असलेला एकही प्रकल्प नाही. सध्या पाणी मुबलक असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
...असा आहे पाणीसाठा शिल्लक
माजलगाव-परळी विभाग | ५७.१८ |
बीड विभाग | ५१.३५ |
परळी विभाग (समन्वय) | ७०.३५ |
मध्यम प्रकल्प | ५२.०३ |
लघु प्रकल्प | ३२.९७ |
एकूण कृष्णा खोरे | ४२.७३ |
मध्यम प्रकल्प सर्व एकूण | ४०.५६ |
लघु प्रकल्प सर्व एकूण | ४०.५६ |
सर्व एकूण (गो. खोरे कृष्णा खोरे) | ५२.२४ |
११९ टक्के पाऊस
* बीड जिल्ह्यात ६९९.३० एवढा वार्षिक सरासरी पाऊस होतो. २०२४ मध्ये १ जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत ८३७.३० मिमी एवढा पाऊस झाला. त्याची टक्केवारी ११९ एवढी होती. म्हणजे सरासरीच्या तुलनेत अतिरिक्त पाऊस झाला होता.
* त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा पाण्याची चिंता भासली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ एकच लघु प्रकल्प कोरडा पडला आहे. ६ प्रकल्प जोत्याखाली आहेत तर २५ ते ५० पाणीसाठा असलेले ५६ प्रकल्प आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water: प्राधिकरणाने जनतेकडून मागितल्या हरकती; असा नोंदवा आक्षेप वाचा सविस्तर