पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका वर्षभरात खडकवासला प्रकल्पातून १८ टीएमसी पाणी उचलते. सध्या या चारही प्रकल्पांत १८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत हा साठा ६१ टक्क्यांवर आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून आतापर्यंत ४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा तब्बल १३ टीएमसीने जास्त आहे. जुलैतच साठा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होण्याची ही वेळ पहिल्यांदाच असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होतआहे.
धरण | टीएमसी | टक्के |
खडकवासला | १.१९ | ६०.२६ |
पानशेत | ६.४१ | ६०.१८ |
वरसगाव | ८.५० | ६६.३४ |
टेमघर | १.८६ | ५०.०९ |
एकूण | १७.९६ | ६१.६१ |
चार धरणांत १८ टीएमसी पाणी
आतापर्यंत चारही धरणांत मिळून १८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. त्यात खडकवासला धरणात १.१९ टीएमसी अर्थात ६०.२६ टक्के पाणीसाठा आहे. दिवसभरात या चारही धरणांत २८७दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने सध्या खडकवासला धरणातून सध्या एक हजार ६५५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून एकूण ४ टीएमसी पाण्याचा विसर्ग केला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांत मिळून केवळ ५.२७ टीएमसी अर्थात १८ टक्के पाणीसाठा होता.