Join us

मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट; अजून किती दिवस जोरदार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:37 IST

montha cyclone update अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम आहेत.

मुंबई : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम असून, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकणकिनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्या आहेत.

या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्रीच एक वाजता आंध्रप्रदेशच्या किनारी धडकले. आता त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू असून, गुरुवारी हे क्षेत्र विदर्भालगत असेल.

शुक्रवारी त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू राहील आणि त्याच दिवशी हे क्षेत्र युपी, बिहारच्या दिशेने सरकत सिक्कीमकडे वाटचाल करील.

त्यामुळे पुढील तीन दिवस या परिसरात पावसाची शक्यता आहे; तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र धिम्या गतीने पुढे सरकत आहे.

कशामुळे अवकाळी◼️ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळेमहाराष्ट्रात अवकाळीचे संकट.◼️ अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्ट्यांच्या आसपास रेंगाळला.

मराठवाड्यातील ४० मंडळांत जोरदार पाऊसमराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील ४० मंडळांत अतिवृष्टी झाली असून बुधवारी सकाळपर्यंत ७ मंडळांत १०० ते १६० मिमीदरम्यान पाऊस झाला आहे. एकूण ८०० गावांच्या हद्दीत हा पाऊस झाला आहे. एकट्या लातूर जिल्ह्यातील २८ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्यालातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने रेणा नदीस पूर आला. पुराच्या पाण्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्या आणि पुलाला येऊन अडकल्या आहेत. भर पावसात बनिम वाचविण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत.

अधिक वाचा: शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Cyclone Montha Brings Unseasonal Rain to Maharashtra; Heavy Rainfall Forecast

Web Summary : Maharashtra faces unseasonal rain due to Cyclone Montha, with warnings for Konkan. Heavy rainfall is expected across the state until November 5th. Marathwada's 40 regions experienced heavy rainfall, impacting soybean crops in Latur, where crops have been washed away due to flooding.
टॅग्स :हवामान अंदाजपाऊसचक्रीवादळमहाराष्ट्रमुंबईविदर्भमराठवाडासोयाबीनगुजरात