मुंबई : उत्तरेकडील गारठ्याचा प्रभाव मुंबईसह राज्यावर जाणवू लागला असून, रविवारपासून राज्यभरातील किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.
राज्यात सोमवारी नाशिक जिल्ह्यातील कुंदेवाडी येथील गहू कृषी संशोधन केंद्रात हंगामातील ६.४ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली.
राज्यातील अनेक शहरांचा पारा १५ अंशाखाली घसरला आहे. विशेष म्हणजे थंडीचा कडाका बुधवारपासून आणखी वाढणार असून, पाऱ्याची ही घसरण तीन दिवस कायम राहील.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, बुधवारपासून राज्याच्या अंतर्गत भागात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट होईल. त्यामुळे आणखी हिवाळा जाणवेल. हा काल पुढील तीन दिवस कायम राहू शकतो. त्यानंतर हळूहळू थंडी कमी होईल.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या म्हणण्यानुसार, १९ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवेल. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात रात्री थंडीचा कडाका जाणवेल.
विशेषतः उत्तर महाराष्ट्रात, नाशिक, छ. संभाजी नगरसह खान्देश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात रात्री थंडीच्या लाटेसह, तर दिवसा थंड दिवसामुळे हुडहुडीचा अनुभव येईल. मुंबईसह कोकणात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके जाणवू शकते.
का वाढते आहे थंडी?
◼️ दक्षिण भारतातील ईशान्य (हिवाळी) मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
◼️ त्यामुळे तेथील हंगामी पूर्वीय वारे १३ अंश अक्षवृत्तादरम्यानच मर्यादित राहतील, अशीही शक्यता आहे.
◼️ त्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीला अटकाव होणार नाही आणि राज्याला हुडहुडी भरणार आहे.
◼️ शिवाय वायव्य आशियातून, सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी (झंजावात) प्रकोपचा प्रभाव आहे.
◼️ त्यामुळे ईशान्येकडील थंड वारे महाराष्ट्राकडे झेपावत असल्याचे चित्र आहे.
परभणीला ६.६ अंश तापमानाची नोंद
◼️ सोमवारी नाशिक जिल्ह्यातील कुंदेवाडी येथील गहू कृषी संशोधन केंद्रात हंगामातील ६.४ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली.
◼️ परभणी जिल्ह्यात रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले.
◼️ जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअस होते, मात्र दुसऱ्याच दिवशी, सोमवार ८ डिसेंबर रोजी त्यात ३ अंशांची मोठी घट होत पारा ९.४ अंशावर आला.
काही पिकांना तारक तर काहींना मारक
ही थंडी रब्बी पिकांना पोषक ठरणार आहे, तर द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा, मावा यांचा प्रादुर्भाव वाढेल. गहू, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
अधिक वाचा: उन्हाळी भुईमूग व तीळ पिकांच्या प्रमाणित बियाण्यासाठी मिळणार १००% अनुदान; कशी कराल नोंदणी?
