हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरात तापमान कमी झाले आहे.
रविवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे.
उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता येईल.
पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा बसला नाही. आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुखद गारव्याचा अनुभव येत आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रात पारा घसरण्याची शक्यता
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस उत्तर- मध्य महाराष्ट्रात तापमान आणखी खाली जाईल. रात्रीचे तापमान दोन ते चार अंशांनी खाली राहण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञ म्हणतात, गारवा कायम राहणार
हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १५ ते १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत तापमान आणखी कमी होईल. त्यानंतर तापमानात काहीशी वाढ होईल. मात्र गारवा कायम राहील.
किमान तापमान (अंश सेल्सिअस)
ठाणे - २३
मुंबई - १९.६
माथेरान - १७.४
सांगली - १६.९
नंदुरबार - १६.२
सोलापूर - १५.६
नांदेड - १५.१
धाराशिव - १५
सातारा - १४.५
पुणे - १४.३
मालेगाव - १४
परभणी - १३.६
महाबळेश्वर - १२.८
छत्रपती संभाजीनगर - १२.८
अहिल्यानगर - १२.५
नाशिक - १२.५
बीड - ११.८
जळगाव - १०.५
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व उत्तर अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने तर विदर्भात २ डिग्रीने किमान तापमान खाली येईल. सप्ताहभर म्हणजे शनिवारपर्यंत चांगल्या थंडीची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
अधिक वाचा: बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थांवर आली गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ
